Nashik-Pune Semi High Speed Railway : गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेल्या नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. खरंतर हा रेल्वे मार्ग प्रकल्प गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात गतीने पूर्ण होत होता. यासाठीचे भूसंपादन जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा पातळीवर प्रयत्न केले जात होते.
मात्र महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात या प्रकल्पाला अपेक्षित अशी गती मिळाली नाही. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मधला अजित पवार यांचा गट सामील झाला आहे. या नवोदित सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाचा कारभार देण्यात आला आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारताच अजित दादा यांनी या प्रकल्पासाठी हालचाली वाढवल्या आहेत. या प्रकल्पासाठी त्यांनी नुकतीच एक आढावा बैठक देखील घेतली आहे. एवढेच नाही तर या प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे पवार स्वतः पाठपुरावा करणार आहेत.
यामुळे गेल्या वर्षभरापासून साईडला पडलेला हा प्रकल्प पुन्हा एकदा जलद गतीने पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. मात्र अजित पवार यांनी या प्रकल्पामध्ये जातीने लक्ष घातले असले तरी देखील या प्रकल्पाच्या पुढ्यात असलेली अडचणी आणि आव्हाने अजूनही कायमच आहेत.
प्रकल्पासाठी मुख्य अडचण काय
हा प्रकल्प पुणे आणि नासिक या दोन शहरांना जोडणारा अति महत्त्वाचा आणि राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत नासिक-अहमदनगर-पुणे असा 232 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. लांबीचा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे.
या तिन्ही जिल्ह्यांसाठी हा रेल्वे मार्ग खूपच महत्त्वाचा असून या तिन्ही जिल्ह्यांचा एकात्मिक विकास या प्रकल्पामुळे साध्य होणार आहे. या मार्गावरील रेल्वेचा 200 किलोमीटर प्रतितास एवढा वेग राहणार असून यामुळे पुणे ते नाशिक दरम्यान चा प्रवास पावणे दोन तासात पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत पुणे ते नाशिक दरम्यान एकूण 24 स्थानक तयार केली जाणार असून या प्रकल्पात एकूण 18 बोगदे, 41 उड्डाणपूल, 128 भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आली आहेत. एकंदरीत हा प्रकल्प नाशिक ते पुणे दरम्यान प्रवासासाठी खूपच फायदेशीर राहणार आहे.
सध्या नाशिक ते पुणे असा रेल्वे मार्ग नाही यामुळे या शहरा दरम्यान रेल्वे मार्ग झाला पाहिजे अशी दोन्ही शहरांमधील नागरिकांची इच्छा आहे. पण हा प्रकल्प राज्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असला तरी देखील केंद्र सरकारने अद्याप या प्रकल्पाला मान्यता दिलेली नाही. केंद्राची मान्यता नसल्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध झालेला नाही.
याचा परिणाम म्हणून नासिक, नगर व पुणे जिल्ह्यात जमीन संपादन व अन्य महत्वाच्या बाबींवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या या तीनही जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाचे काम मंदावले आहे. आता मात्र अजित पवार यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून यामुळे संबंधित भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
प्रकल्पाची सद्यस्थिती काय
या प्रकल्पासाठी नासिक जिल्ह्यातील नासिक व सिन्नर या दोन्ही तालुक्यातील 22 गावांमध्ये 282 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. यामध्ये सिन्नर तालुक्यातील 17 गावांचे दर घोषित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भूसंपादनाचे 18 टक्के काम पूर्ण झाले आहे. नासिक तालुक्यात मात्र जमिनीचे दर घोषित झालेले नाहीत.
नासिक, अहमदनगर व पुणे या तिन्ही जिल्ह्यात या मार्गासाठी 1470 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र केंद्राने मंजुरी दिलेली नसल्यामुळे यासाठी निधीची चणचण भासत आहे. दरम्यान या रेल्वे मार्गासाठी नाशिक जिल्ह्यात आता अलाइनमेंटमध्ये बदल होणार आहे. यापूर्वी देखील या रेल्वे मार्गात असा बदल झाला आहे आणि आता नव्याने बदल होणार आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम आणखी रखडणार असे चित्र आहे.