Namo Shetkari Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी शेकडो योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपसण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्माननिधी या दोन अशाच महत्त्वाकांक्षी योजना आहेत.
यातील पीएम किसान ही केंद्रीय पुरस्कृत योजना आहे तर नमो शेतकरी ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र राज्य शासनाची योजना आहे. पी एम किसान अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात.
पण, हे पैसे एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. आतापर्यंत पीएम किसान चे 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच अठराव्या हप्त्याची देखील तारीख ठरली आहे.
पी एम किसान चा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दुसरीकडे याच योजनेच्या धर्तीवर शिंदे सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली असून नमो शेतकरी अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सहा हजार रुपये मिळणार आहेत.
या पैशांचे वितरण देखील पीएम किसान प्रमाणेच होत आहे. आतापर्यंत नमो शेतकरीच्या पात्र शेतकऱ्यांना चार हप्ते मिळाले असून पाचव्या हप्त्यासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद देखील केली आहे.
नमोच्या पाचव्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने २ हजार २५४ कोटी रुपयांच्या निधी वितरणास अर्थातच काल सोमवारी मान्यता दिली आहे. यामुळे लवकरच नमो शेतकरी चा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
अशातच राज्य शासनाच्या कृषी विभागातील सूत्रांकडून राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकऱ्याचा हप्ता सोबतच दिला जाऊ शकतो अशी माहिती देण्यात आली आहे. निश्चितच जर शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी चे हप्ते सोबतच मिळालेत तर याचा सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार पीएम किसान आणि नमो शेतकरीचे प्रत्येकी दोन हजार म्हणजेच एकूण चार हजार रुपये एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते अशी शक्यता जाणकारांनी देखील वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नवरात्र उत्सव, विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करता येणार आहे.