Namo Shetkari Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू झाल्या आहेत. शेती क्षेत्राच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाकडून नियमित प्रयत्न केले जात आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे भारताच्या निम्म्याहुन अधिक जनसंख्येचे उपजीविकेचे साधनच शेती आहे.
देशातील जवळपास 50 ते 60 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर आधारित आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्रावर अवलंबून असल्याचे पाहायला मिळते. शेती क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल जात.
यामुळे देशाला कृषीप्रधान देशाचा तमगा मिळाला आहे. म्हणून शासनाकडूनही शेतकऱ्यांसाठी विविध योजना चालवल्या जात आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये पीएम किसान योजनेचा देखील समावेश होतो.
ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना असून 2019 मध्ये ही योजना सुरू झाली आहे. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जात आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता अशा वार्षिक समान तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जात आहे.
याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेला नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभ देखील झाला आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत.
या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे देखील तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. या योजनेचा नुकताच पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळालेला आहे. अशा परिस्थितीत आज आपण नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 12,000
आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मिळत होते. आता राज्य शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केली असल्याने या योजनेचे देखील सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.
जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र असतील त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील पीएम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना आता वार्षिक 12 हजार रुपये मिळणार आहेत.
नमो शेतकरी योजनेसाठी कोण राहणार पात्र?
पीएम किसानचा लाभ हा देशभरातील शेतकऱ्यांना मिळतो. पण नमो शेतकरीचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या योजनेचा लाभ फक्त ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन आहे त्याच शेतकऱ्यांना मिळतो.
या योजनेचा लाभ आमदार, खासदार तसेच सरकारी नोकरदारांना मिळत नाही.
ज्या लोकांना दरमहा दहा हजार रुपये पेक्षा अधिक पेन्शन मिळते अशा पेन्शन धारकांना देखील या योजनेचा लाभ दिला जात नाही.
या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच सदस्याला घेता येतो.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. सोबतच बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य आहे.
ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कोण-कोणती कागदपत्रे लागणार ?
कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे या योजनेच्या लाभासाठी देखील आवश्यक राहणार आहेत. नमो शेतकरी योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी दाखला, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याचा तपशील, जमिनीचे कागदपत्रे 7/12 व 8अ, पासपोर्ट आकाराचे फोटो यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.
ऑफलाइन अर्ज कसा करणार
नमो शेतकरी योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्हा कार्यालयात कृषी विभागात भेट द्यावी लागेल. तिथून तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्ज काळजीपूर्वक भरावा लागेल आणि या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे तुम्हाला या अर्जासोबत जोडावे लागतील. अर्ज जमा केल्यानंतर मग तुमची या योजनेसाठी नोंदणी केली जाईल आणि अशा तऱ्हेने मग तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करणार
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. वेबसाईटवर तुम्हाला तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायची आहे. तुमची नवीन अर्जदार म्हणून नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
यासाठी तुम्हाला होम पेजवर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. तेथे विचारलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. यानंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. अशा तऱ्हेने तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.