Namo Shetkari Yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहे. 2019 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना सुरू केली आहे. ही योजना पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणून संपूर्ण देशात लोकप्रिय आहे.
या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची रक्कम दिली जात आहे. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकरकमी मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते.
आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 17 हप्ते मिळालेले आहेत. विशेष बाब अशी की या योजनेचा पुढील 18 वा हफ्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या योजनेची लोकप्रियता पाहता गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त सहा हजार रुपयांची भेट दिली जात आहे.
म्हणजे राज्यातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण 12000 रुपये मिळणार आहेत. नमो शेतकरी योजनेबाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत या योजनेचे तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांना मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा दुसरा आणि तिसरा हफ्ता शेतकऱ्यांना देऊ करण्यात आला आहे.
म्हणजेच नमो शेतकरीचे पैसे जमा होऊन आता पाच महिन्यांपेक्षा अधिकचा काळ झाला आहे. यामुळे या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार हा मोठा सवाल आहे. खरंतर जून महिन्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी आशा होती.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आणि केंद्रात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शिंदे सरकार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असे वाटत होते.
मात्र जून आणि जुलै महिना उलटला असतानाही या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. यामुळे आता नमो शेतकरीचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.
तथापि काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्यातील सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करू शकते असे म्हटले जात आहे.