Namo Shetkari Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना 2019 मध्ये सुरू झाली असून तेव्हापासून या योजनेचा अविरतपणे देशभरातील करोडो शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. यामुळे करोडो शेतकरी लाभान्वित होत असल्याने ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना बनली आहे.
दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या योजनेपैकी ही एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. दर चार महिन्यांनी या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेचा लाभ संबंधित पात्र शेतकऱ्यांना मिळत आहे.
आपल्या राज्यातीलही लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान 28 जुलै 2023 रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा तेरावा हप्ता वितरित झाल्यानंतर आता जुलै महिन्यात या योजनेचा 14 वा हफ्ता वितरित करण्यात आला आहे.
नमो शेतकरी योजना काय आहे?
नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केली आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणेच दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणेच याही योजनेअंतर्गत पैसे दिले जाणार आहेत. अर्थातच पीएम किसान चे 6,000 आणि नमो शेतकऱ्याचे 6,000 असे एकूण 12,000 महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
या योजनेचा लाभ पीएम किसानच्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. या योजनेसाठी पीएम किसान योजनेचेच निकष लावून देण्यात आले आहेत. खरंतर पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हफ्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्याचा लाभ दिला जाणार होता. मात्र हा लाभ मिळाला नाही. दरम्यान नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेसाठी 4,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे आता राज्यातील पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरलेल्या 87 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या एका महिन्याच्या काळात या योजनेचा पहिला हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील येत्या महिन्याभरात या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. निश्चितच या योजनेसाठी निधीची तरतूद झाली असल्याने आता या योजनेचा पहिला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.