Namo Shetkari Yojana : केंद्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजने संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या निधीचे वितरण होत आहे.
परवापर्यंत या योजनेचे एकूण तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले होते. पण याचा चौथा हप्ता काल अर्थातच 21 ऑगस्ट 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. परळी येथे आयोजित कृषी महोत्सवातून हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते हा हप्ता थेट पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
यामुळे सध्या या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चौथ्या हप्त्याची वाट पाहिली जात होती. अखेरकार या योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे.
90 लाख 88 हजार 556 शेतकऱ्यांना नमो शेतकरी च्या चौथ्या हप्त्याद्वारे 1888 कोटी 30 लाख 26 हजार रुपयांचा लाभ देऊ करण्यात आला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या पैशांमुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे.
पाचवा हप्ता कधी मिळणार?
नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच वेळी दिला गेला होता. 28 फेब्रुवारी 2024 ला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता सोबतच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.
यामुळे या योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता सोबतच शेतकऱ्यांना दिला जाईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात होता. परंतु काल महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेचा चौथा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. यामुळे या योजनेचा पाचवा हप्ता कधी मिळणार हा मोठा यक्षप्रश्न आहे.
मात्र जाणकार लोकांनी येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार या योजनेचा पुढील पाचवा हप्ता हा पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू शकते असा दावा केला आहे. यामुळे याचा पाचवा हप्ता सप्टेंबर मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.