Namo Shetkari Yojana : महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती व शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. अशा स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून विविध योजना सुरू केल्या जात आहेत. नुकत्याच सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
शिंदे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्माननिधी योजना सुरू केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की पीएम किसान अंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे एका वर्षात तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत. विशेष म्हणजे पंधरावा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असा दावा केला जात आहे.
पण पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू झालेल्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता अजूनही पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हा हप्ता पीएम किसानच्या चौदाव्या हप्त्यासोबतच दिला जाणार असा दावा केला जात होता, मात्र तसे काही झाले नाही. यामुळे नमो शेतकरी चा पहिला हप्ता केव्हा मिळणार असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 86 लाख 60 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी चा पहिला हप्ता मिळणार आहे. दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाआयटीने सॉफ्टवेअर तयार केले आहे. मात्र, महाआयटीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर तयार झाले असेल तरीदेखील याची अंतिम चाचणी न झाल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजारांचा पहिला हप्ता अद्याप जमा झालेला नाही.
ऑगस्ट महिना अखेरपर्यंत नमो शेतकरीचा पहिला हप्ता मिळणार असे सांगितले जात होते. पण आता येत्या तीन दिवसात ऑगस्ट महिन्याचा सेंड ऑफ होणार आहे. तरीही या योजनेचा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही. यामुळे आता हा पहिला हप्ता सप्टेंबर महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असे सांगितले जात आहे.
याबाबत मात्र महाराष्ट्र राज्य शासनाकडून कोणतीच माहिती पुरवण्यात आलेली नाही. दरम्यान पीएम-किसानचे निकष आणि संगणकीय माहिती नमो शेतकरी योजनेसाठी वापरा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या असून या पार्श्वभूमीवर महाआयटीकडून संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. यामुळे या योजनेचा पहिला हप्ता लवकरच राज्यातील 86 लाख 60 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असा दावा केला जात आहे.