Namo Shetkari Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अर्थसंकल्प 2023-24 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एका नवीन योजनेची घोषणा केली आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना असे या योजनेचे नाव आहे. ही योजना केंद्रातील पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे हे पैसे दिले जातात. दरम्यान नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.
दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणेच याही योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी पीएम किसान योजनेचे पात्र शेतकरी लाभार्थी म्हणून गृहीत धरले जाणार आहेत. याचाच अर्थ राज्यातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याला पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकऱ्याचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेची घोषणा होऊन आता सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटला आहे, पण तरीही या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
खरंतर या योजनेचा पहिला हप्ता पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासोबतच दिला जाईल असे सांगितले जात होते. मात्र पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता 27 जुलै 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. पण नमो शेतकरी चा पहिला हप्ताच शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
या योजनेसाठी निधीची तरतूद मात्र झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण तरीही या योजनेचा हप्ता वितरित होत नाहीये. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असून शासनाविरोधात नाराजी वाढत आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे.
परंतु शासनाकडून याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेच्या पहिल्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील जवळपास 85 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता पुढल्या महिन्यात दिला जाऊ शकतो. पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात नवरात्र उत्सव साजरा केला जाणार असून या सणाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
नमो शेतकरीचा पहिला हप्ता हा घटस्थापनेच्या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. परंतु याबाबत शासनाकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.