Namo Shetkari And Ladki Bahin Yojana : गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजना सतत चर्चेत राहिली आहे. ही योजना गेल्या वर्षी सुरु करण्यात आली, या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली असून आतापर्यंत या योजनेचे एकूण 6 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून ज्या महिला नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता याच बाबत मोठी अपडेट समोर आलीये. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सरकारची नेमकी याबाबतची भूमिका काय आहे ? याचे संकेत दिलेले आहेत.
मंडळी लाडकी बहिण योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून जानेवारी महिन्याच्या पैशासंदर्भात देखील मोठी माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्याचा पैसा हा 14 जानेवारीच्या आधीच म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची योजना सरकार आखत असल्याची बातमी काही प्रसार माध्यमांमध्ये झळकली आहे.
नक्कीच सरकारने हा निर्णय घेतला तर लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. मात्र, जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्याआधीच लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे राज्यातील जवळपास 20 लाख महिला या योजनेच्या पूर्ण लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
ज्या शेतकरी महिला नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी फक्त 12 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना वर्षाकाठी 18 हजार रुपये दिले जाणार आहेत, मात्र ज्या महिला नमो शेतकरीचा लाभ घेतात त्यांना लाडकी बहीण अंतर्गत फक्त बारा हजार रुपये दिले जाणार अशा चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहेत.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ महिला घेत असतील तर शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे वजा होतील, असा काही निर्णय झालेला आहे का? असं विचारलं असता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, “असा निर्णय झालेला नाही. मात्र, दोन्ही पैकी एका योजनेत महिलांनी सहभाग नोंदवावा”, असं कोकाटे यांनी स्पष्ट केलं. कोकाटे पुढे म्हणाले, “सरकारच्या योजनेत एका माणसाला दोन योजनांचा फायदा घेता येतो का? नाही घेता येत.
एक शेतकरी एकाच जमीनीवर दोन बँकेकडून कर्ज घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग जे नियम इतरांना आहेत तेच नियम या ठिकाणीही लागू होतील. योजना वेगळ्या असल्या तरीही. अन्यथा दोन योजनांचा लाभ महिला घेऊ शकतील असा जीआर सरकारला काढावा लागेल”, असंही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.
म्हणजेच, गेल्या दोन दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा आता सत्यात उतरतील असे दिसते. अजून सरकारकडून याबाबतचा निर्णय घेतला गेलेला नसला तरी देखील सरकारची भूमिका माणिकराव कोकाटे यांच्या विधानावरून स्पष्ट झाली आहे. यामुळे मात्र लाडक्या बहिणींच्या मनात सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात रोष तयार झालेला आहे.
अनेकांनी महायुती सरकारने आमची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी केला आहे. म्हणून आता सरकार या योजनांच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेणार ही गोष्ट पाहण्यासारखी ठरेल आणि त्यानंतर सर्वसामान्य जनता सरकारच्या निर्णयावर कशी रिऍक्ट करणार हे सुद्धा पाहणे तेवढेच उत्सुकतेचे राहणार आहे.