Nagpur Railway News : बारा वर्षांनी उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कुंभमेळ्याचे आयोजन होईल. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान श्रीक्षेत्र प्रयागराज येथे हा अतिभव्य धर्मसोहळा पार पडणार आहे. यामुळे सध्या सर्वत्र अगदीच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान महाराष्ट्रातून कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. कुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वेने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून नागपूर येथूनही विशेष गाडी धावणार आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते दानापूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामुळे कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
दरम्यान आज आपण नागपूर ते दानापुर दरम्यान कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या या विशेष एक्सप्रेस यांच्या संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार यासंदर्भात माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ०१२१७ नागपूर – दानापूर कुंभमेळा विशेष रेल्वे २६ जानेवारी तसेच ५, ९ व २३ फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी १०.१० वाजता नागपूर स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दानापूरला पोहोचणार आहे.
हीच गाडी ०१२१८ क्रमांकासह दानापूर येथून २७ जानेवारी तसेच ६,१० व २४ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता परतीच्या प्रवासाला निघणार आहे आणि गाडी रवाना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला नरखेड, आमला, बैतूल, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, मिर्झापूर, चुनार, पं. दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर आणि आरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
या गाड्यांचे बुकिंग सुद्धा नुकतेच सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही कुंभमेळ्यासाठी जायचे असेल तर आत्तापासूनच या गाडीसाठी तिकीट बुकिंग करावे लागणार आहे.