Mumbai Vande Bharat Train : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती.
यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या स्थितीला देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष बाब अशी की यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला एकूण सहा वंदे भारत ट्रेन मिळालेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष बाब अशी की मुंबईला आणखी एका नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाईल असे संकेत दिले होते.
यामुळे नजिकच्या काळात मुंबई ते कोल्हापूर दरम्यानही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच आता मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा वेग वाढणार असल्याचा दावा केला जात आहे.
सध्या या गाडीचा वेग 130 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. मात्र हा वेग ताशी 30 किलोमीटरने वाढणार आहे. अर्थातच या ट्रेनचा वेग हा 160 किलोमीटर प्रति तास एवढा होणार आहे.
15 ऑगस्ट 2024 पासून 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने ही गाडी धावणार आहे. रेल्वे बोर्डाने जून अखेरपर्यंत या ट्रेनचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक असणारे काम पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई आणि वडोदरा विभागाला दिले आहेत.
सध्या मुंबई ते अहमदाबाद दरम्यान प्रवास करण्यासाठी वंदे भारत ट्रेन ला पाच तास पंधरा मिनिटांचा कालावधी खर्च करावा लागतोय. मात्र जेव्हा ही गाडी 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावेल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी 30 मिनिटांनी कमी होणार आहे.
अर्थातच यामुळे प्रवाशांचे बहुमूल्य 30 मिनिट वाचणार आहेत. यामुळे मुंबई ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास जलद होणार आहे.