Mumbai Vande Bharat Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आधीपासूनच फार अधिक आहे. रेल्वेचा प्रवास एकतर खिशाला परवडतो आणि दुसरे म्हणजे रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. अशा या परिस्थितीत अनेक जण रेल्वेने प्रवास करण्याला पसंती दाखवतात.
रेल्वे देखील आपल्या प्रवाशांचा प्रवास कशा तऱ्हेने सुरक्षित होईल, आरामदायी होईल अन जलद होईल यासाठी नेहमीच नवनवीन सुधारणा करत असते. याचाच एक भाग म्हणून रेल्वेने 2019 साली वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली. ही गाडी आज संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे.
या गाडीचा फक्त भारतातच डंका वाजतोय असे नाही तर साता-समुद्रापार सुद्धा या गाडीची लोकप्रियता वाढू लागली आहे. सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यातील 11 गाड्या आपल्या महाराष्ट्रातून धावतात.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर ही गाडी चालवली जात आहे.
यातील तीन गाड्या या नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या आहेत. अशातच कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कोल्हापूरला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे.
ही गाडी कोल्हापूर ते मुंबई दरम्यान चालवली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच मुंबई येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत कोल्हापूर-मिरज-सांगली-मुंबईदरम्यान वेगळी ‘वंदे भारत’ देण्याबाबत आग्रही मागणी केली.
या आग्रही मागणीवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी होकार दाखवला आहे. रेल्वेमंत्र्यांनी या मार्गावर तातडीने नवी गाडी देण्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच कोल्हापूर-मिरज-मुंबई वेगळी ‘वंदे भारत’ रेल्वे सुरू होणार अशा आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
खरेतर सध्या नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर अशा वंदे भारत सुरू केल्या आहेत. या गाड्या आठवड्यातून तीन-तीन दिवस चालवल्या जातात.
मात्र यापैकी पुणे ते हुबळी ही गाडी आठवड्यातून तीन ऐवजी सहा दिवस चालवली जाऊ शकते आणि कोल्हापूर-पुणे ही गाडी कोल्हापूर मिरज मुंबई अशी स्वातंत्र गाडी म्हणून चालवली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नक्कीच याबाबत जर सकारात्मक निर्णय झाला तर कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.