Mumbai Vande Bharat Express : सध्या देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई येथून सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. तसेच उपराजधानी नागपूर येथून दोन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या सहा वंदे भारत एक्सप्रेस मुंबईवरून सुरू आहेत.
तसेच नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या दोन गाड्या उपराजधानी येथून सुरू आहेत. दरम्यान मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नजीकच्या भविष्यात श्रीक्षेत्र कोल्हापूर येथे स्थित करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला जाणे सोपे होणार आहे.
कारण की श्रीक्षेत्र कोल्हापूर ते मुंबई दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे संकेत मिळू लागले आहेत. वास्तविक, कोल्हापूर येथील अंबाबाईच्या दर्शनासाठी संपूर्ण देशातील भाविक येतात. राज्यातील कानाकोपऱ्यातील भाविक या ठिकाणी येतात.
मुंबईमधील देखील मोठी जनता अंबाबाईच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र कोल्हापूरला हजेरी लावत असते. याशिवाय कोल्हापूर येथील हजारो लोक दररोज कामानिमित्त मुंबईला जात असतात.
यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन अर्थातच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी कोल्हापूर आणि मुंबई येथील नागरिकांच्या माध्यमातून केली जात आहे.
विशेष बाब अशी की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला लवकरच वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असे सांगितले होते.
तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुंबई ते कोल्हापूर दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर वंदे भारत ट्रेन सुरू होणार असे संकेत दिले होते.
दरम्यान आता खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करा अशी मागणी केली आहे.
यामुळे, आगामी काळात या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते अशा चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. जर रेल्वे बोर्डाने या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला तर राजधानी मुंबईला सातवी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे आणि कोल्हापूरला पहिली हायस्पीड ट्रेन मिळणार आहे.