Mumbai Vande Bharat Express News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला एकूण सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
यापैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव म्हणजेच मुंबई ते गोवा या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असल्याने या गाडीच्या प्रवासी संख्येत आणखी वाढ होत आहे.
येत्या काही दिवसांनी गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. गणपतीसाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असते. यंदाही गणपतीला मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावाला जाणार आहेत.
विशेष म्हणजे गणपतीला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वेच्या माध्यमातून विशेष एक्सप्रेस गाड्या देखील चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वेने यंदा अनेक गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
दुसरीकडे कोकण रेल्वे मार्गावर सुरू असणाऱ्या मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे गणेशोत्सवाच्या काळातील आरक्षण फुल झाले आहे. महागडे तिकीट दर असतानाही प्रवाशांनी या गाडीला विशेष पसंती दाखवली आहे.
यामुळे आता गणपतीच्या काळात आणखी अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याची मागणी केली जात आहे. तसेच मुंबई ते गोवा दरम्यान सुरू असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याचीही मागणी केली जात आहे.
सध्या या मार्गावर आठ डब्यांची वंदे भारत ट्रेन सुरू आहे मात्र ही ट्रेन 16 डब्यांची करावी अशी मागणी प्रवासी संघटनांच्या माध्यमातून उपस्थित केली जात आहे. किमान गणेशोत्सवाच्या काळात तरी या ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवली पाहिजे अशी मागणी प्रवाशांची आहे.
अखंड कोकण रेल्वे सेवा समिती प्रवासी संघटनेच्या माध्यमातून ही मागणी उपस्थित करण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वे प्रवासी संघटनेच्या या मागणीवर काय निर्णय घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पण जर या मार्गावर सुरू असणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे डबे वाढवले गेले तर याचा नक्कीच मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.