Mumbai Vande Bharat Express News : महाराष्ट्रासह सबंध देशभरात सध्या वंदे भारत एक्सप्रेस विषयी सर्वाधिक चर्चा पाहायला मिळत आहेत. गाव खेड्यापासून ते मेट्रो शहरांपर्यंत सर्वत्र वंदे भारत एक्सप्रेसची क्रेझ आहे. हीच क्रेच लक्षात घेता आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवले जात आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू केली आहे.
यापैकी पाच मार्ग आपल्या महाराष्ट्रातूनच जात आहेत. राज्यात सध्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, नागपूर ते बिलासपुर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे.
यामध्ये मुंबई ते कोल्हापूर दरम्यान देखील ही गाडी सुरू व्हावी अशी प्रवाशांची इच्छा आहे. विशेष म्हणजे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. अर्थातच मुंबई ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास ही गाडी सुरू झाल्यास गतिमान होणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई ते कोल्हापूर दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस केव्हा सुरू होणार? याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झाल्यानंतर या मार्गावर ही गाडी सुरू होऊ शकते. सध्या मिरज- पुणे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
कोल्हापूर आणि मिरज दरम्यानचा मार्ग एकेरी आहे, यामुळे ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. ही कामे मार्च 2024 पर्यंत पूर्ण होतील आणि त्यानंतरच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली आहे. ही गाडी सुरू झाल्यानंतर कोल्हापूर ते मुंबईच्या प्रवासातील वेळेत जवळपास चार तासांपर्यंतची बचत होणार असा दावा करण्यात आला आहे. साहजिकच कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास यामुळे गतिमान होणार आहे.