Mumbai Vande Bharat Express News : मुंबईहून वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करणारे रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. सध्या देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईहून चार वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एकूण पाच महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून या पाचपैकी चार मुंबईहून धावत आहेत.
सध्या राज्यात मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे.
हेच कारण आहे की, राज्याला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दिली जाणार असा दावा केला जात आहे. यामध्ये लवकरच मुंबई ते कोल्हापूर दरम्यान ही हाय स्पीड ट्रेन सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अशातच मात्र मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी येथील साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
किती दिवस राहणार बंद ?
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या माध्यमातून भुसावळ मनमाड दरम्यान थर्ड लाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. जवळपास 183.94 किलोमीटर लांबीच्या या थर्ड लाइनच्या कामासाठी दोन दिवस मध्य रेल्वेच्या जवळपास 34 रेल्वे गाडा रद्द करण्यात आल्या असून. या मार्गावर इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर सहा गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत आणि वीस गाड्याचे मार्ग चेंज करण्यात आले आहेत.
14 ते 15 ऑगस्ट दरम्यान जवळपास 15 तास या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार असून यामुळे 34 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई ते शिर्डी आणि शिर्डी ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. म्हणजेच सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस 14 आणि 15 ऑगस्ट रोजी धावणार नाही.