Mumbai To Bhopal Train : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये ही संख्या आणखी वाढत असते. दिवाळीच्या काळात तर रेल्वेचे तिकीट मिळतं नाही, एवढी जबरदस्त गर्दी पाहायला मिळते. यंदाच्या दिवाळी आधी मात्र मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक मोठी घोषणा केली आहे.
यामुळे दिवाळीच्या काळातही प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मात्र ही वंदे भारत एक्सप्रेस शयनयान प्रकारातील राहणार आहे.
सध्या भारतात चेअर कार प्रकारातील वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. भारतातील एकूण 52 मार्गावर चेअरकार वंदे भारत एक्सप्रेस धावतायेत. मुंबईहून सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून या सर्व वंदे भारत एक्सप्रेस चेअर कार प्रकारातील आहेत.
देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या सहा मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
विशेष म्हणजे या सर्व वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळतोय. दरम्यान आता भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. येत्या काही दिवसांनी वंदे भारत स्लीपर ट्रेन लॉन्च होणार आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई ते बरेली या मार्गावर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार असा दावा करण्यात आला होता. दरम्यान आता मुंबई ते भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्टेशन यादरम्यानही शयनयान प्रकारातील वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
सध्या मुंबईहून भोपाळसाठी केवळ दोन एक्स्प्रेस गाड्या धावतात. राणी कमलापतीहुन धावणारी लष्कर आणि एलटीटी एक्सप्रेस दोन्ही साप्ताहिक गाड्या आहेत.
तर पंजाब मेल, कुशीनगर, मंगला, कामायनी, राजधानी, तुलसी, पुष्पक, गोरखपूर-एलटीटीसह 20 हून अधिक गाड्या या मार्गावर धावत आहेत. पण, या गाड्या प्रवाशांची संख्या पाहता अपुऱ्या पडत आहेत.
हेच कारण आहे की या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी होत आहे. दरम्यान, आता प्रवाशांची होणारी गैरसोय थांबावी यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबई ते भोपाळ दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.
त्यामुळे जर या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर मुंबई ते भोपाळ हा प्रवास आणखी जलद आणि सुरक्षित होणार आहे. विशेष बाब अशी की ही गाडी दिवाळी आधीच सुरू होऊ शकते असे म्हटले जात आहे. यामुळे दिवाळीच्या काळात मुंबई ते भोपाळ हा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे.