Mumbai Solapur Vande Bharat Express : मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या मार्गावर फेब्रुवारी 2023 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे.
दहा फेब्रुवारीला सुरू झालेली ही गाडी अल्पावधीतच रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. या गाडीमुळे सोलापूरकरांचा पुणे आणि मुंबईकडील प्रवास गतिमान झाला आहे. शिवाय पुणेकरांना मुंबईकडे जलद कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. या गाडीमुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी झाला आहे.
मात्र या गाडीचे तिकीट दर पाहता सर्वसामान्यांना या गाडीचा फायदा होत नसल्याचा आरोप प्रवाशांच्या माध्यमातून केला जात आहे. वास्तविक या गाडीला सुरुवातीच्या टप्प्यात खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता या गाडीला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसून जवळपास 40% सीट रिकाम्या राहत आहेत.
या गाडीने प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येत आहे. शिवाय या गाडीमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा इतर एक्सप्रेसच्या तुलनेत चांगल्या आहेत. मात्र या गाडीचे तिकीट दर पाहता प्रवाशांनी या गाडीकडे पाठ फिरवली आहे. या गाडीचे तिकीट दर महाग आहे शिवाय या गाडीचा वेग हा इतर एक्सप्रेसच्या बरोबरीचाच आहे. यामुळे या गाडीमुळे प्रवाशांच्या वेळेत देखील बचत होत नाहीये.
यामुळे या गाडीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली असून यामुळे ही गाडी तोट्यात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देशभरातील वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर कमी होणार नसल्याचा दावा केला जात आहे.
अशा परिस्थितीत या गाडीचे तिकीट दर कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड प्रवासी संघाकडून पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. संघाच्या माध्यमातून यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी मासिक पासची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यामुळे आता या निवेदनावर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाकडून काय निर्णय घेतला जातो? या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक पासची सुविधा उपलब्ध करून दिली जाते का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे. जर मध्ये रेल्वेने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला तर वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून या निर्णयामुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.