Mumbai Solapur Vande Bharat Express : भारताची सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी आजची ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर वंदे भारत ट्रेन ही सध्या भारतीय रेल्वेची शान आहे. ही ट्रेन प्रत्येक राज्यात चालवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या देशातील 52 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राला देखील आठ वंदे भारत एक्सप्रेस मिळालेले आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनचा वेग 160 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. या ट्रेनमध्ये वर्ल्डक्लास सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मात्र या गाडीचे तिकीट दर हे खूपच अधिक आहे.
पण, या ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थाबाबत प्रवाशांमध्ये संशयाचे वातावरण आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये जेवणाचे नियम काय आहेत, जेवणाचे टाईम टेबल काय आहे. या ट्रेन ने प्रवास करणाऱ्यांना नाश्ता कधी मिळतो, दुपारचे जेवण कधी मिळतं असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खरेतर, तिकीट बुकिंगच्या वेळी, केटरिंग पर्यायांमध्ये फक्त शाकाहारी, मांसाहारी किंवा कोणतेही खाद्य पर्याय दिसत नाहीत. दुपारच्या जेवणाची आणि नाश्त्याची वेळ सुद्धा नमूद केलेली नाहीये. पण प्रवासादरम्यान जेवणाची निवड केली असेल तर दुपारचे जेवण आणि नाश्ता नक्कीच मिळतो एवढे मात्र नक्की आहे.
वंदे भारत ट्रेन मध्ये जेवण आणि नाश्ता कधी मिळतो
वंदे भारतमध्ये कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गोंधळाचा सामना करावा लागतो. प्रवासी सामान्यतः अल्प अंतराच्या प्रवासातही नाश्ता आणि दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणाची अपेक्षा करतात. त्यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात.
दरम्यान, मध्य रेल्वे मुंबईचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील नीला सांगतात की, प्रवासादरम्यान नाश्त्याच्या वेळी नाश्ता आणि दुपारचे किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी जेवण दिले जाते.
स्वप्निल यांनी सांगितल्याप्रमाणे, मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये कल्याण नंतर नाश्ता सुरू होतो. पुण्यानंतर जेवणाची वेळ होते, तेव्हा जेवण मिळते. जर समजा एखाद्याचा प्रवास नाश्त्याच्या वेळी संपत असेल तर त्याला जेवण मिळणे कठीण होते.
नाश्ता अन जेवणात काय दिले जाते?
सकाळी धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चहा व्यतिरिक्त पोहे, उपमा, आलू वडा, बिस्किट, ज्यूस इत्यादी नाश्त्याचे पदार्थ दिले जातात. नाश्त्यात ऑम्लेट, बिस्किटे, ब्रेड बटर, कॉफी आदी पदार्थ दिले जातात.
संध्याकाळी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रात्रीच्या शाकाहारी जेवणात साधी भाजी, पनीरची भाजी, पराठे, रोटी, डाळ, भात, दही, मिठाई इ. दिले जाते. मांसाहारामध्ये चिकन कोलापुरी, चिकन मसाला, कढई चिकन, रोटी, डाळ, भात आदी पदार्थ मिळतात.