Mumbai Shirdi Vande Bharat Express : फेब्रुवारी 2023 मध्ये मोदी सरकारने महाराष्ट्राला एक मोठी भेट दिली. 10 फेब्रुवारी 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या दोन अतिशय महत्त्वाच्या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू झाली. या मार्गावर ही गाडी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा पुण्याकडील तसेच सोलापूर कडील आणि शिर्डीकडील प्रवास गतिमान झाला आहे.
प्रवाशांनी या दोन्ही गाडीला भरभरून असा प्रतिसाद दिला आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ही गाडी 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट रोजी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला असून याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव- मनमाड दरम्यान 14 आणि 15 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
जळगाव-मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी आणि दुहेरी मार्गाच्या यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली आहे.
मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर १४ व १५ ऑगस्ट हे दोन दिवस तब्बल ३५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये सीएसएमटी-साईनगर शिर्डी आणि साईनगर शिर्डी ते सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. निश्चितच यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दोन दिवस अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस धावतात ?
राज्यात संपूर्ण भारतीय बनावटीच्या पाच वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या पाच अति महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत. विशेष बाब अशी की या पाच पैकी चार वंदे भारत एक्सप्रेस मध्य रेल्वेअंतर्गत येतात.