Mumbai Shirdi Vande Bharat Express : गेल्या चार ते पाच वर्षांच्या काळात भारतीय रेल्वेने देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गावर संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे. आतापर्यंत देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. या गाडीचा कमाल स्पीड 160 किलोमीटर प्रति तास एवढा असून यामुळे ज्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे तेथील प्रवाशांचा प्रवास हा खूपच जलद आणि सुरक्षित झाला आहे.
या गाडीमुळे प्रवाशांना जलद प्रवास करता येत आहे शिवाय गाडीमध्ये असलेल्या आधुनिक सोयी सुविधा प्रवाशांचा प्रवास आरामदायी बनवत आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकादरम्यान ही गाडी सुरू केली होती.
10 फेब्रुवारी रोजी या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तेव्हापासून ही गाडी या मार्गावर अविरतपणे सुरू आहे. प्रवाशांनी देखील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. दरम्यान आता या ट्रेन संदर्भात एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरील प्रवाशांना आता कमी वेळेत मुंबई ते शिर्डीचा प्रवास करता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की जेव्हापासून ही गाडी सुरू झाली आहे तेव्हापासून या गाडीचा सरासरी वेग 83 किलोमीटर प्रति तास एवढा राहिला आहे. मात्र आता यामध्ये मोठी वाढ होणार असून या वंदे भारतचा स्पीड हा 130 किलोमीटर प्रतितास एवढा होणार आहे.
खरंतर या गाडीचा कमाल स्पीड 160 किलोमीटर प्रतितास आहे मात्र सध्या या मार्गावरील रेल्वे ट्रॅकची क्षमता पाहता 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने आता या मार्गावर गाडी धावणार आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या निर्देशानुसार आता मध्य रेल्वेने या मार्गावरील रुळांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रॅक अपग्रेडेशनचे काम सुरू झाले आहे.
जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा या मार्गावर 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी धावेल. यामुळे मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासाच्या वेळेत तब्बल 30 मिनिटांची बचत होणार आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचा केवळ वंदे भारत एक्सप्रेसला फायदा होईल असे नाही तर या मार्गावर धावणाऱ्या इतरही एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत यामुळे बचत होणार आहे.