Mumbai Shirdi Vande Bharat Express : मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही एक्सप्रेस ट्रेन फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू करण्यात आली आहे. तेव्हापासून ही गाडी या मार्गावर नियमित चालवली जात आहे. या ट्रेनमुळे मुंबई ते शिर्डीचा प्रवास गतिमान झाला आहे.
यामुळे मुंबईहून साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे. या ट्रेनला अगदी सुरुवातीपासूनच प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दाखवला आहे. दरम्यान, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा स्पीड वाढणार आहे. मध्य रेल्वे या गाडीचा स्पीड ताशी 130 किलो मीटर पर्यंत वाढवणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
खरंतर, वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल स्पीड ताशी 180 किलोमीटर एवढा आहे. भारतीय रेल्वे बोर्डाने मात्र या गाडीला 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास परवानगी दिली आहे. मात्र या मार्गावर हाय स्पीड रेल्वे ट्रॅक नेटवर्कच्या कमतरतेमुळे ही गाडी पूर्ण क्षमतेने धावत नाही. ही गाडी इगतपुरी ते शिर्डी दरम्यानच्या 125 किलोमीटरच्या अंतरावर सध्या स्थितीला 110 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावत आहे.
त्यामुळे या गाडीचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेने या मार्गावरील रेल्वे ट्रॅक मध्ये सुधारणा सुरू केल्या आहेत. या रेल्वे ट्रॅक मधील सुधारणा पूर्ण झाल्या तर या ट्रेनच्या प्रवासाचा वेळ किमान 30 मिनिटांनी कमी होणार असल्याचा दावा केला जात आहे. याचा फायदा इगतपुरी ते भुसावळ मार्गावरील इतर गाड्यांनाही होणारा असा आशावादही व्यक्त केला जात आहे.
ट्रॅकचे अपग्रेडेशन पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या माध्यमातून इगतपुरी-मनमाड या मार्गावर सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी 130 किलोमीटर पर्यंत वाढवला जाणार आहे. एकंदरीत मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या या गाडीचा वेग येत्या काही महिन्यात वाढवला जाणार असल्याने या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी गतिमान होण्यास मदत मिळणार आहे.