Mumbai Railway News : मुंबई आणि मुंबई उपनगरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. मात्र मुंबई लोकलचा प्रवास हा फारच आव्हानात्मक आहे. पण भविष्यात पनवेल ते बोरिवली दरम्यानचा प्रवास हा सुपरफास्ट होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव-पनवेल, सीएसएमटी ते अंधेरी-गोरेगावपर्यंत लोकल धावत आहेत.
मात्र, येत्या काही महिन्यांनी पनवेल ते बोरिवली दरम्यान थेट लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. गोरेगाव-बोरीवली हार्बर लाइन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर मालाड स्थानकात एक एलिव्हेटेड स्थानकाचे कामही प्रगतीपथावर आहे.
सध्या कांदिवली आणि बोरीवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गंतच हार्बर लाइनचा विस्तार म्हणून आणखी दोन मार्गिका जोडल्या जातील. या प्रकल्पासाठी जवळपास 825 कोटींचा खर्च करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेकडून MUTP-3A अंतर्गत हे काम केले जाणार आहे.
या प्रकल्पाचे काम एकूण दोन टप्प्यात केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत गोरेगाव ते मालाडपर्यंत 2 किमीचे काम केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पहिला टप्पा हा येत्या दोन-तीन वर्षात सुरू होईल असे दिसते. हा टप्पा 2026 ते 27 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टप्प्याबाबत बोलायचे झाले तर मालाड ते बोरीवलीपर्यंतचा 5 किमीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. हा दुसरा टप्पा 2027 ते 28 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर थेट बोरीवली-पनवेलपर्यंत लोकल सुरू होणार आहे.
यामुळे पनवेल पर्यंतचा प्रवास वेगवान होणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर 72 किमीचा प्रवास ट्रेन न बदलता फक्त 20 रुपयांत करता येणार आहे हे विशेष. ही लोकल सुरू झाल्यानंतर मुंबईहून पनवेलपर्यंत पोहोचणे सोप्पे होणार आहे.
मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून थेट पनवेल पर्यंत लोकलने येता येणार असल्याने या प्रकल्पाचा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. गोरेगाव ते मालाड आणि मालाड ते बोरिवली असा एकूण आठ किलोमीटरचा हा मार्ग राहील. यामुळे हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार होणार आहे.