Mumbai Railway News : देशाच्या आर्थिक राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत अर्थातच मुंबईमध्ये राज्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्रातील हा पहिला भूमिगत मेट्रो मार्ग लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
खरंतर मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी, नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी करून अधिका-अधिक सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा यासाठी शहरात आणि उपनगरात मेट्रो मार्गांचे जाळे तयार केले जात आहे. आतापर्यंत शहरातील विविध मार्गांवर मेट्रो सुरू झाले आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये शहरातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो सुरू होणार आहे. यामध्ये आरे-कफ परेड या मेट्रो ३ मार्गाचा देखील समावेश आहे. सध्या या मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून या मार्गाचा पहिला टप्पा 2023 च्या अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
केव्हा सुरु होणार पहिला टप्पा
आरे-कफ परेड मेट्रो मार्ग 3 हा राज्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्क आहे. या मेट्रो मार्ग अंतर्गत 27 स्थानके विकसित होणार आहेत. विशेष म्हणजे यापैकी 26 स्थानके भूमिगत आणि एक स्थानक जमिनीवर राहणार आहे. आरे ते बीकेसी हा या मार्गाचा पहिला टप्पा राहणार आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण दहा स्थानकांचा समावेश आहे.
आतापर्यंत या दहापैकी चार स्थानके तयार करण्यात आली आहेत. विमानतळ ते आरे कारशेड दरम्यान ही चार स्थानके आहेत. सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका व विमानतळ टर्मिनल २ या चार भूमिगत स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील उर्वरित सहा स्थानकाची कामे देखील युद्धपातळीवर सुरू आहेत.
या पहिल्या टप्प्यात आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, विमानतळ टर्मिनल २, सहार रोड, देशांतर्गत विमानतळ, सांताक्रूझ, विद्यानगरी व बीकेसी या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आरे हे संपूर्ण मार्गातील एकमेव जमिनीवरील स्थानक आहे.
या पहिल्या टप्प्यात एकूण नऊ गाड्या चालवल्या जाणार असून आत्तापर्यंत आरे येथील कारशेड मध्ये आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. यामुळे हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.