Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मुंबई लोकलसंदर्भात. खरतर लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जात आहे. शहरातील आणि उपनगरातील नागरिकांसाठी लोकल हे महत्त्वाचे प्रवासाचे साधन आहे. मात्र असे असले तरी अजूनही उपनगरातील काही भागात लोकल सुरु झालेली नाही.
उरणकरांना देखील अजून लोकलची भेट मिळालेली नाही. पण नेरूळ ते उरणदरम्यान जवळपास अडीच दशकांपूर्वी म्हणजेच 26 वर्षांपूर्वी रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र नेरूळ ते उरण हा संपूर्ण रेल्वे मार्ग अजूनही सुरू झालेला नाही. यामुळे या भागातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत नेहमीच संभ्रमावस्था पाहायला मिळालेली आहे.
मध्यंतरी या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच नेरूळ ते खारकोपर हा सुरू करण्यात आला आहे. हा पहिला टप्पा पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 मध्ये सुरू झाला आहे. दरम्यान रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच खारकोपर ते उरण हा पूर्णपणे बांधून रेडी झाला आहे. विशेष म्हणजे आता या दुसऱ्या मार्गावर लवकरच रेल्वे धावणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबर 2023 रोजी अर्थातच विजयादशमी झाल्यानंतर दोन दिवसांनी खारकोपर ते उरण हा रेल्वेमार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. या मार्गावर आता लवकरच लोकल धावणार आहे. विशेष बाब अशी की, हा रेल्वे मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केला जाणार आहे.
पीएम मोदी या मार्गाला हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर मग उरणकरांना लोकलने थेट मुंबई गाठता येणार आहे. या रेल्वे मार्गामुळे मुंबई, नवी मुंबई आणि उरण या भागातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यास मदत मिळणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वेच्या विद्याविहार येथील विद्युत वाहनाने खारकोपर पासून गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी व उरण या मार्गावरील वीज वाहिन्यांची नूकत्याच काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची तपासणी केली आहे.
दरम्यान कोणताही मार्ग सुरू होण्यापूर्वी ही अशाच प्रकारची तपासणी करण्यात येते अशी माहिती विद्युत तपासणी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. यामुळे आता हा खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग 26 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वसामान्यांसाठी सुरू होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.