Mumbai Railway News : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात राज्यात जोरदार अवकाळी पाऊस बरसला होता. महाराष्ट्रात आणि भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुद्धा जोरदार पावसाची हजेरी लागली.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये तर अजूनही पाऊस सुरूच आहे. यासोबतच देशातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. धुक्यात वाढ झाली असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे.
यामुळे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होत आहे. अपघाताची शक्यता लक्षात घेता भारतीय रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत.
अशातच आता बाराबंकी-अयोध्या-शाहगंज-जफ्राबाद रेल्वे विभागाचे दुहेरीकरण आणि बाराबंकी स्थानकाचे यार्ड रिमोल्डिंगची कामे हाती घेण्यात आली आहेत.
यामुळे या विभागात मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईहून धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. मुंबईहून धावणाऱ्या अनेक गाड्या जानेवारी महिन्यापर्यंत रद्द होणार आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण या कामांमुळे मुंबईहून धावणाऱ्या कोणत्या गाड्या रद्द राहतील याची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या गाड्यां रद्द राहणार
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर-मुंबई गाडी क्रमांक १२५९७ ही ट्रेन १२ डिसेंबर ते ९ जानेवारी या कालावधीत रद्द केली जाणार आहे. तसेच मुंबई-गोरखपूर एक्सप्रेस अर्थातच गाडी क्रमांक 12598 ही ट्रेन 13 डिसेंबर ते 10 जानेवारी दरम्यान रद्द केली जाणार आहे.
याशिवाय वांद्रे टर्मिनस-गोरखपूर दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी 10 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीत रद्द केली जाणार आहे. तसेच गोरखपूर ते वांद्रे टर्मिनस दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी १२ डिसेंबर ते १६ जानेवारी या कालावधीमध्ये रद्द केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एवढेच नाही तर लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते गोरखपूर दरम्यान चालवली जाणारी एक्सप्रेस ट्रेन वेगवेगळ्या तारखांना रद्द राहणार आहे आणि गोरखपूर-लोकमान्य टिळक एक्सप्रेस देखील वेगवेगळ्या तारखांना रद्द केली जाणार अशी माहिती देण्यात आली आहे.
यामुळे निश्चितच रेल्वे प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ऐन नववर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे विभागाने घेतलेल्या या ब्लॉकमुळे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो.