Mumbai Railway News : राजधानी मुंबईमध्ये प्रवासासाठी लोकलला विशेष पसंती दाखवली जाते. शहरातील लाखो नागरिक दैनंदिन कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकलने प्रवास करतात. यामुळे मुंबई लोकलला शहराची लाईफलाईन अर्थातच जीवितवाहिनी म्हणून ओळखली जाते.
मात्र या जीवितवाहिनीतून प्रवास करताना जीव मुठीत ठेवून जावे लागते. लोकल गाड्यांमध्ये होणाऱ्या तोबा गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. शिवाय शहरातील अनेक रेल्वे मार्गांवरील लोकल गाड्यांचा वेग हा खूपच कमी आहे.
यामुळे नागरिकांचा इच्छित ठिकाणी जाण्यासाठीचा बहुमूल्य वेळ वाया जातो. शहरातील काही रेल्वे मार्गांवरील लोकल अवेळी धावतात, वेग मर्यादेमुळे लोकलचा वेग मंदावतो यामुळे लोकलचा कायमचं खोळंबा होत असल्याचे पाहायला मिळते.
एक तर आधीच लोकलमध्ये जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतो आणि त्रास सहन करूनही प्रवाशांना वेळेत इच्छित ठिकाणी जाता येत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मात्र आता लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमागील शुक्लकाष्ट लवकरच संपणार आहे. मध्य रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन रेल्वे मार्गावरील सर्व पायाभूत कामे जलद गतीने पूर्ण करून लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे शहरातील मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांचा वेग वाढणार आहे. आता आपण कोणत्या मार्गांवरील लोकलचा वेग वाढणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
चार मार्गावरील लोकल गाड्यांचा वेग वाढणार
हाती आलेल्या माहितीनुसार हार्बर मार्गावरील टिळक नगर ते पनवेल ३३ किमीच्या मार्गावर, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी १८ किमीच्या मार्गावर आणि नेरूळ ते खारकोपर ९ किमीच्या मार्गावरील लोकल गाड्यांचा वेग वाढणार आहे. सध्या या तिन्ही महत्त्वाच्या मार्गावर लोकलचा ताशी वेग हा ८० किमी एवढा आहे.
पण हा वेग लवकरच वाढणार असून या मार्गावर लोकलचा वेग ताशी १०५ किमीपर्यंत जाणार आहे. या मार्गांवरील वेग वाढवण्यासाठी सर्व आवश्यक कामे पूर्ण केली जाणार आहेत. याशिवाय, कर्जत ते खोपोली या १५ किमी मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांचा देखील वेग वाढणार आहे.
सध्या या मार्गावर ६० किलोमीटर प्रतितास या वेगाने लोकल धावत आहे मात्र लवकरच या मार्गावर देखील 90 किलोमीटर प्रतितास या वेगाने लोकल धावेल अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे.
याशिवाय नेरूळ ते खारकोपर दरम्यान लोकलच्या फेऱ्याही वाढवल्या जाणार आहेत. यामुळे या चारी मार्गांवरील लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.