Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे नेरूळ ते उरण रेल्वे मार्गाबाबत. खरंतर हा रेल्वे मार्ग उरणकरांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा रेल्वे मार्ग सुरू झाला तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहुन थेट उरण पर्यंत लोकल धावू शकणार आहे.
सध्या स्थितीला नेरूळ ते उरण या संपूर्ण रेल्वे मार्गापैकी नेरूळ ते खारकोपर दरम्यानचा रेल्वे मार्ग सुरू आहे. नेरूळ ते खारकोपर रेल्वे मार्ग 2018 मध्येच सुरू करण्यात आला होता आणि 2020 पर्यंत खारकोपर ते उरण पर्यंतचा रेल्वेमार्ग सुरू करण्याचे उद्दिष्टे डोळ्यासमोर प्रशासनाने ठेवले होते. मात्र या उद्दिष्टांप्रमाणे कामे झाली नाहीत.
या रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा वेगवेगळ्या कारणांनी अजूनही रखललेलाच आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भूसंपादनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानंतर मग वनविभागाचा अडसर आला होता. यामुळे या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वेमार्गांचे काम खूपच संथगतीने सुरू राहिले. पण आता या रेल्वे मार्गावरील रुळांचे काम पूर्ण झाले आहे.
रेल्वे मार्गावरील रुळांचे काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपूर्वी खारकोपर ते उरण पर्यंत लोकलची ट्रायल रन देखील घेण्यात आली होती. या मार्गावर ट्रायल रन झाली यामुळे उरणकरांना आता लोकल उरणपर्यंत लवकरच धावणार असे वाटत होते. मात्र आता ट्रायल रन होऊन पाच महिन्यांचा काळ उलटला आहे.
तरीही या मार्गावर लोकल धावलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर काही बारीक-सारीक कामे बाकी आहेत. तसेच रेल्वे आयुक्तांनी काही तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार सध्या या मार्गावर कामे सुरू आहेत. पावसाळ्यात ही तांत्रिक कामे व्यवस्थित करता येत नव्हती मात्र आता येत्या काही दिवसात या तांत्रिक कामांना अधिक गती मिळणार आहे आणि लवकरात लवकर ही कामे पूर्ण होणार आहेत.
याबरोबरच गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम बाकी आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी देखील काही काळ वाट पहावी लागणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे खारकोपर ते उरण मार्गावर राहिलेली ही सर्व कामे आता दिवाळीपर्यंत होतील. ही कामे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाकडून या मार्गावर रेल्वे चालवले जाईल आणि या मार्गाची चाचणी घेतली जाईल.
या चाचणीत सर्व काही यथायोग्य राहीलं तर मग या मार्गावर रेल्वे चालवण्यास परवानगी मिळेल. यानंतर मग या मार्गावर लोकल धावेल. या रेल्वे मार्गामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उरणदरम्यान थेट लोकलने प्रवास करता येणार आहे. यामुळे उरण शहराला मुंबई आणि नवी मुंबईशी थेट लोकलची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
यामुळे उरणकरांचा सीएसएमटीकडील प्रवास जलद होणार आहे. दरम्यान या मार्गाचे उद्घाटन दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. यामुळे या मार्गाच्या कामात कोणतीच घाई न करता सर्व कामे व्यवस्थित रित्या रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहेत. एकूणच काय की या रेल्वे मार्गांची कामे दिवाळीपर्यंत पूर्ण होणार असल्याने दिवाळीनंतर खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन होऊ शकते.