Mumbai Railway News : दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात अन अनेकजण आपल्या गावाकडे रवाना होऊ लागले आहेत. शिक्षणानिमित्त बाहेरगावी असणारे विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या गावाकडे जात आहेत. याशिवाय पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहे.
परिणामी रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान सध्या मुंबई मधून मराठवाड्याकडे जाणाऱ्यांची संख्या देखील खूपच उल्लेखनीय असून याच मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे मराठवाड्यातील जनतेसाठी आता एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबई ते करीमनगर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
विशेष म्हणजे ही एक्सप्रेस ट्रेन राज्यातील 10 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. ही गाडी मराठवाड्यातून धावणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातून मुंबईकडे आणि मुंबईहून मराठवाड्याकडे येणाऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.
आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक अन या गाडीला कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे याविषयी माहिती पाहणार आहोत.
कसं राहणार संपूर्ण वेळापत्रक ?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि करीमनगर रेल्वेस्थानक यादरम्यान साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीएसएमटी ते करीमनगर ही गाडी ९ एप्रिल आणि २८ मे या कालावधीत चालवली जाणार आहे.
ही गाडी कालावधीत दर मंगळवारी सीएसएमटी येथून १५:३० वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ८:३० वाजता करीमनगर येथे पोहोचणार आहे.
तसेच करीमनगर ते सीएसएमटी ही विशेष गाडी १० एप्रिल आणि २९ मे दरम्यान चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी दर बुधवारी १९:०५ वाजता करीमनगर येथून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी १३:४० वाजता मुंबईला पोहोचणार आहे.
या विशेष गाडीच्या सीएसएमटी ते करीमनगर आणि करीमनगर ते सीएसएमटी अशा दोन्ही दिशेने प्रत्येकी आठ फेऱ्या अशा एकूण 16 फेऱ्या होणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
ही विशेष गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आर्मूर, मेटपल्ली, कोरूटला या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती मध्ये रेल्वेने यावेळी दिलेली आहे. यामुळे या गाडीचा मराठवाड्यातील प्रवाशांना सर्वाधिक फायदा होणार असे बोलले जात आहे.