Mumbai Railway News : सालाबादाप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा पर्व मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. यंदा 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान यावर्षी गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे.
या गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील गोरगरीब जनतेला गणेशोत्सवाचा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले आहे.
याशिवाय गणेशोत्सवाच्या सणाला मुंबईमधून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी कोकण रेल्वेकडून गणपती विशेष ट्रेन देखील चालवल्या जाणार आहेत. खरंतर गणेशोत्सवाचा सण हा कोकणातील एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सण आहे. या सणाला मुंबई, पुण्यासारख्या शहरात कामासाठी गेलेले चाकरमाने पुन्हा गावाकडे, कोकणात परतत असतात.
या काळात मुंबईमधून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असते. दरम्यान मुंबई शहरात कामानिमित्त स्थायिक झालेल्या याच चाकरमान्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सहा रेल्वे गाड्या आणि 338 एसटी महामंडळाच्या आणि खाजगी बसेस मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई भाजपातर्फे एक ट्रेन, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे एक ट्रेन, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यातर्फे दोन अशा चार मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणात चालवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे आणखी दोन गाड्यांची व्यवस्था लवकरच केली जाणार आहे.
तसेच या गाड्यांपैकी पहिल्या गाडीला 15 सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 सप्टेंबरला पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती समोर आली आहे. निश्चितच गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना या गाडीमधून मोफत प्रवास करता येणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान भाजपाकडून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील मतदात्यांना साधण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले जात आहे.