Mumbai Railway News : उद्या संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. स्वातंत्र्य दिनामुळे या आठवड्यात सलग सुट्ट्या पडणार आहेत. आता या सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक जण बाहेरगावी फिरायला जाणार आहेत. तसेच 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण आहे.
साहजिकच आता अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतणार आहेत. परिणामी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या काळात प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत कामानिमित्त, शिक्षणानिमित्त वास्तव्यास असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मध्य रेल्वे एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे.
ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर Railway Station यादरम्यान चालवली जाणार आहे. यामुळे मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्यांना आणि कोल्हापूरहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.
अशा परिस्थितीत आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार हे देखील पाहणार आहोत.
कसे राहणार मुंबई-कोल्हापूर विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक ०१४१७) २० ऑगस्टला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटी येथून निघणार आहे आणि कोल्हापूरला दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे.
गाडी क्रमांक ११४१८ म्हणजे कोल्हापूर-सीएसएमटी विशेष एक्सप्रेस ट्रेन १८ ऑगस्टला रात्री १० वाजता कोल्हापूर येथून सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी सीएसएमटीला येणार आहे. म्हणजेच या विशेष ट्रेनची कोल्हापूर ते मुंबई अशी एक फेरी आणि मुंबई ते कोल्हापूर अशी एक फेरी होणार आहे.
कसे राहतील थांबे ?
स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनला कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज स्थानकात थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे.