Mumbai Railway News : मुंबई आणि कोल्हापूर ही राज्यातील दोन महत्त्वाची शहरे. कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे तर मुंबईची राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. शिवाय कोल्हापूरला मोठे अध्यात्मिक महत्त्व देखील प्राप्त आहे. कोल्हापूरमध्ये असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक कोल्हापूरमध्ये हजेरी लावतात.
राजधानी मुंबईमधून कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील खूपच उल्लेखनीय आहे. तसेच कोल्हापूरमधून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या ही नेहमीच जास्त राहिली आहे. मात्र असे असले तरी या दोन्ही शहरादरम्यान खूपच कमी रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत.
विशेष म्हणजे कोरोना काळापासून या दोन्ही शहरा दरम्यान धावणारी सह्याद्री एक्सप्रेस देखील बंद करण्यात आली आहे. आधीच या मार्गावर कमी गाड्या चालवल्या जातात आणि त्याहून मोठा कहर म्हणजे या मार्गावर सुरू असलेल्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणून या मार्गावरील प्रवासी खूपच नाराज आहेत.
गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आलेली सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांची आहे. दरम्यान आता रेल्वे प्रवाशांच्या या मागणीला प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. कोल्हापूर ते मुंबई दरम्यान चालवली जाणारी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू होईल अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.
कारण की, या एक्सप्रेस बाबत प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्सप्रेस आता पुण्यापर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पण ही रेल्वे थेट मुंबईपर्यंत चालवली पाहिजे ही प्रवाशांची मागणी आजही कायमच आहे.
याशिवाय, कोल्हापूर ते कलबुर्गी एक्सप्रेस सकाळच्या सत्रात तसेच पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी कोल्हापूरहून कुर्डूवाडीपर्यंत पॅसेंजर सुरु करण्याच्या निर्णयाला रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी म्हणजेच 8 सप्टेंबर 2023 ला मान्यता दिली आहे. ही कोल्हापूर ते कुर्डूवाडी चालवली जाणारी पॅसेंजर गाडी पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी कोल्हापूर वरून सोडली जाणार आहे.
याशिवाय दादर ते पंढरपूर एक्सप्रेसचा विस्तार मिरजपर्यंत आणि कोल्हापूर ते सिकंदराबाद व्हाया कलबुर्गी एक्सप्रेस साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे प्रशासनाने या निर्णयांची अंमलबजावणी 15 दिवसांमध्ये करण्यात येणार अशी घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. निश्चितच रेल्वे प्रशासनाने असलेले हे निर्णय कोल्हापूरमधील प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहेत.