Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. श्रावण महिना सुरू झाला की सणासुदीचा हंगाम सुरू होत असतो. मात्र या सणासुदीच्या काळात रेल्वेमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. या अतिरिक्त गर्दीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
दिवाळी आणि छठ पूजेला तर रेल्वेमध्ये पाय ठेवायलाही जागा राहत नाही. यामुळे ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन आता रेल्वे प्रशासनाने मुंबईहून दोन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईहून वाराणसी आणि मुंबईहून दानापूरला विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत. दरम्यान आता आपण या दोन्ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
मुंबई वाराणसी विशेष एक्सप्रेसचे वेळापत्रक : या विशेष गाडीच्या दिवाळी आणि छठ पूजेच्या निमित्ताने चार फेऱ्या होणार आहेत. मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी ही विशेष गाडी 30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे.
एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता ही गाडी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता ही गाडी वाराणसी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच वाराणसी-एलटीटी विशेष एक्सप्रेस ट्रेन ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात चालवली जाणार आहे.
ही गाडी वाराणसी येथील रेल्वे स्थानकावर रात्री साडेआठ वाजता निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजून 55 मिनिटांनी ही गाडी मुंबईला पोहोचणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते दानापूर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक : या गाडीच्या ८ फेऱ्या होणार आहेत. एलटीटी- दानापूर विशेष एक्सप्रेस ट्रेन २६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर यादरम्यान चालवली जाणार आहे.
या काळात ही गाडी दर शनिवारी आणि सोमवारी एलटीटी येथून दुपारी सव्वा बारा वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता ही गाडी दानापूरला पोहोचणार आहे. तसेच दानापूर एलटीटी विशेष एक्सप्रेस ट्रेन २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवार आणि मंगळवारी ही गाडी दानापूर येथून सायंकाळी सव्वा सहा वाजता सोडले जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता ही गाडी एलटीटीला पोहोचणार आहे.