Mumbai-Pune Shivneri Ticket Rate : मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढत असते. यंदा सुद्धा उन्हाळी सुट्ट्या लागल्यापासून या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस, खाजगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वे गाड्या देखील हाउसफुल धावत आहे. अशातच मात्र मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे मुंबई ते पुणे दरम्यान अटल सेतू मार्गे धावणाऱ्या शिवनेरी बसची संख्या वाढवण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार अटल सेतू मार्गे धावणाऱ्या शिवनेरी बसची संख्या 15 एवढी करण्यात आली आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.
मुंबई ते पुणे दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होत असल्याने ही प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जात आहे. साहजिकच या निर्णयाचा प्रवाशांना मोठा फायदा होणार असून राजधानी मुंबई ते सांस्कृतिक राजधानी पुणे हा प्रवास सुखकर होणार आहे.
ऐन उन्हाळी सुट्ट्या आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याने निवडणुकीसाठी आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे गावी जाणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय मोठा फायद्याचा ठरणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारतातील सर्वाधिक लांबीच्या सागरी पुलामुळे अर्थातच मुंबई ते नवी मुंबई यांना जोडणाऱ्या अटल सेतू प्रकल्पामुळे बस प्रवासाचा वेळ हा एक तासांनी वाचत आहे.
मुंबई ते पुणे हा प्रवास वाशी मार्गे करण्यासाठी साडेचार तासांचा कालावधी लागतो मात्र अटल सेतूने प्रवास केल्यास हा कालावधी साडेतीन तासांवर आला आहे. यामुळे अटल सेतू मार्गे धावणाऱ्या शिवनेरी बसची संख्या वाढवली गेली पाहिजे अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून केली जात होती.
विशेष म्हणजे या मागणीला राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सकारात्मक असा प्रतिसाद दिला असून शिवनेरी बस फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आधी अटल सेतूवरुन शिवनेरी बसच्या फक्त दोन फेऱ्या चालवल्या जात होत्या.
पुणे ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर या दोन शिवनेरी बसच्या फेऱ्या अटल सेतू मार्गे चालवल्या जात होत्या. आता मात्र शिवाजी नगर (पुणे) आणि स्वारगेट विभागाने प्रत्येकी पाच शिवनेरी चालवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवनेरी बसच्या तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर दादर-शिवाजी नगर या शिवनेरी बसचे तिकीट दर ५३५ एवढे आहे. स्वारगेट-दादर या शिवनेरी बसचे तिकीट दर ५३५ आणि पुणे-मंत्रालय या शिवनेरी बसचे तिकीट दर ५५५ रुपये एवढे करण्यात आले आहे.