Mumbai Pune Railway : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. सुट्ट्या लागल्या असल्याने आता अनेकजण गावाकडे जात आहेत. गावी जाण्यासाठी मात्र रेल्वेलाच प्राधान्य दिले जात आहे.
रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने आणि कानाकोपऱ्यात रेल्वेचे नेटवर्क पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्याला विशेष पसंती दाखवली जाते. हेच कारण आहे की सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विविध रेल्वे मार्गांवर सुरू असलेल्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. विशेष म्हणजे यातील काही गाड्या राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुण्याहून देखील चालवल्या जाणार आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील सीएसएमटी ते मऊ दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. तसेच पुणे ते दानापुर दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या उन्हाळी विशेष गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सीएसएमटी-मऊ विशेष एक्सप्रेसचे वेळापत्रक
सीएसएमटी-मऊ उन्हाळी विशेष गाडी 10 एप्रिल आणि 1 मे ला सीएसएमटी येथून २२.३५ वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी ११.१० वाजता पोहोचणार आहे.
तसेच मऊ ते सीएसएमटी उन्हाळी विशेष गाडी 12 एप्रिल आणि तीन मे 2024 ला मऊ येथून १३.१० वाजता सुटणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचणार आहे. अर्थातच सीएसएमटी ते मऊ आणि मऊ ते सीएसएमटी यादरम्यान या उन्हाळी विशेष गाडीच्या प्रत्येकी दोन फेऱ्या अशा एकूण चार फेऱ्या होणार आहेत.
सीएसएमटी-मऊ विशेष ट्रेन कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. ही गाडी राज्यातील दादर, ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेत पुढे खंडवा, इटारसी, भोपाळ मार्गे रवाना होणार आहे.
पुणे-दानापूर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार पुणे-दानापूर उन्हाळी विशेष ट्रेन 11 एप्रिल, 14 एप्रिल आणि 2 मे तथा 5 मे रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून साडेसहा वाजता सुटणार आहे आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी बारा वाजता पोहोचणार आहे.
तसेच दानापूर-पुणे उन्हाळी विशेष ट्रेन 12 एप्रिल, 15 एप्रिल, 3 मे तथा 6 मे रोजी दानापूर रेल्वे स्थानकावरून 13:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी 19:45 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
पुणे-दानापूर विशेष एक्सप्रेस कुठे थांबणार
ही विशेष गाडी राज्यातील हडपसर, दौड़ कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याची माहिती समोर आली आहे.