Mumbai Pune Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज महाराष्ट्रातून धावणाऱ्या तब्बल 13 गाड्या ब्लॉकमुळे तीन तास उशिराने धावणार आहेत. यामध्ये मुंबई आणि पुण्यातून धावणाऱ्या काही गाड्यांचा देखील समावेश आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज भुसावळ विभागातील दुसखेडा (ता.यावल) रेल्वे स्थानकातील अप, डाउन लूप लाइनचे काम केले जाणार आहे. या कामासाठी आज 25 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.
या ब्लॉकमुळे या अप आणि डाऊन रेल्वे मार्गावरील तेरा प्रवासी गाड्या विविध स्थानकावर वीस मिनिटांपासून ते तीन तासापर्यंत थांबवल्या जाणार आहेत. यामध्ये मुंबई आणि पुण्यावरून धावणाऱ्या गाड्यांचा देखील समावेश आहे. यामुळे मुंबई आणि पुणे शहरातील रेल्वे प्रवाशांना देखील या ब्लॉकचा फटका बसणार असे सांगितले जात आहे.
यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास खोळंबणार आहे. एवढेच नाही तर या ब्लॉकमुळे काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवल्या जाणार आहेत. आता आपण या ब्लॉकमुळे कोणत्या गाड्या उशिराने धावणार आणि कोणत्या गाड्या पर्यायी मार्गाने वळवल्या जाणार आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या गाड्या उशिरा धावणार
मिळालेल्या माहितीनुसार, आज घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे अप मार्गावरील आठ गाड्या वेगवेगळ्या स्थानकावर वीस मिनिटांपासून ते तीन तासापर्यंत थांबवल्या जाणार आहेत.
1)सीतापूर-एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी सावदा स्टेशनवर 3 तास थांबवली जाणार आहे.
2)वाराणसी-म्हैसूर दरम्यान धावणारी एक्स्प्रेस गाडी निंभोरा स्टेशनवर दोन तासाने पंचावन्न मिनिटांसाठी थांबवली जाणार आहे.
3)वाराणसी – एलटीटी कामायनी एक्स्प्रेस ला देखील रावेर रेल्वे स्थानकावर पावणेतीन तास थांबवले जाणार आहे.
4)याशिवाय गोरखपूर – पुणे एक्स्प्रेसला सुद्धा आजच्या या ब्लॉकमुळे वाघोड स्टेशनवर दोन तासांसाठी थांबवले जाणार आहे.
5)अमृतसर – मुंबई एक्स्प्रेसला देखील आज बऱ्हाणपूरला दीड तास थांबवले जाणार आहे.
6)गोरखपूर – एलटीटी एक्स्प्रेस आज असिरगढला एक तास थांबणार असल्याची माहिती समोर आली आहे.
7)तसेच आज जयनगर – एलटीटी एक्स्प्रेसला चांदनी स्टेशनवर 50 मिनिटांसाठी थांबवली जाणार आहे.
8)याशिवाय आज कटनी – भुसावळ एक्स्प्रेसला नेपानगरला 20 मिनिटांसाठी थांबवले जाईल अशी माहिती समोर आली आहे.
याव्यतिरिक्त डाऊन मार्गावरील पाच गाड्या वेगवेगळ्या स्थानकावर एक तास 40 मिनिटं ते दोन तास 50 मिनिटांपर्यंत थांबवल्या जाणार आहेत.
1)यात मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर दरम्यानच्या एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन तास आणि 50 मिनिटांसाठी थांबवले जाणार आहे.
2)लोकमान्य टिळक टर्मिनस ते दिब्रुगड दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसला आज भुसावळ रेल्वे स्थानकावर एक तास आणि 55 मिनिटांसाठी थांबवले जाणार आहे.
3)तसेच मुंबई ते लखनऊ दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसला आज भुसावळ रेल्वे स्थानकावर पावणे दोन तासांसाठी थांबवले जाणार आहे.
4)तसेच म्हैसूर ते वाराणसी दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसला आज भादली स्टेशनवर एक तास आणि चाळीस मिनिटांसाठी थांबवले जाणार आहे.
5)शिवाय सुरत ते छपरा दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसला आज जळगाव रेल्वे स्थानकावर एक तास आणि ४० मिनिटांसाठी थांबवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्या गाड्या पर्यायी मार्गाने वळवल्या जाणार
या ब्लॉकमुळे आज आग्रा-नांदेड एक्सप्रेस ला पर्यायी मार्गाने वळवले जाणार आहे. ही एक्सप्रेस आज इटारसी-नरखेड-बडनेरा-अकोला मार्गे चालवली जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. निश्चितच आजच्या या ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. यामुळे आज रेल्वे प्रवाशांच्या प्रवासात खोळंबा होणार आहे.