Mumbai Pune News : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांना महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाची शहरे म्हणून ओळखले जाते. यामुळे या शहरांमधील पायाभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाचा विशेष भर असतो.
असे म्हणतात की कोणत्याही राष्ट्राच्या राज्याच्या प्रदेशाच्या आणि शहराच्या विकासात तेथील वाहतूक व्यवस्था महत्त्वाची भूमिका निभावत असते. हेच कारण आहे की या दोन्ही शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध असल्याचे दिसते.
शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून या दोन्ही शहरांमधील वाहतूक व्यवस्था सदृढ व्हावी या अनुषंगाने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला मिसिंग लिंक प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे दरम्यानचे अंतर कमी होऊन प्रवासाचा कालावधी 30 मिनिटांनी कमी होणार आहे. यामुळे भविष्यात मुंबई ते पुणे हा प्रवास सुपरफास्ट, आरामदायी आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे.
मिसिंग लिंक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे 30 मिनिटे वाचणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ तर वाचणारच आहे शिवाय इंधनावरील खर्च देखील कमी होणार आहे.
सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून जून 2025 पर्यंत हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे टार्गेट राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. या प्रकल्पांतर्गत देशातील सर्वात उंच केबल ब्रिज तयार केला जात आहे.
हा पूल 183 मीटर उंच असून दोन डोंगरानदरम्यान विकसित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या पुलाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 20 टक्क्यांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मिसिंग लिंक प्रोजेक्टमुळे 19 किलोमीटरचे अंतर जवळपास सहा किलोमीटरने कमी होऊन नंतर 13.3 किलोमीटर एवढे होणार आहे. सध्या खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर 19 किलोमीटरचे आहे मात्र केबल ब्रिजमुळे हे अंतर 13.3 किलोमीटरवर येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत 13.3 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होत असून याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जात आहे. या मार्गात दोन बोगदे आणि दोन किलोमीटर लांबीचा एक केबल ब्रिज विकसित होत आहे.
या प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या बोगद्यांची लांबी ही 11 किलोमीटर एवढी आहे. या बोगद्यांचे काम 90% पर्यंत पूर्ण झाले आहे. या बोगद्यांचे खोदकाम कधीच पूर्ण झाले असून सध्या फिनिशिंगचे कामे केली जात आहेत.