Mumbai Pune Expressway : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या काळात मुंबई ते पुणे हा प्रवास वेगवान होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या रुंदीकरणाच्या प्रलंबित प्रस्तावाला येत्या दोन महिन्यांत राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार असा दावा करण्यात आला आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या या प्रस्तावित प्रकल्प अंतर्गत सहा लेनचा ९४ किमी लांबीचा द्रुतगती मार्ग आठ लेन पर्यंत विस्तारित केला जाणार आहे. खरे तर हा प्रकल्प गेल्यावर्षीच प्रस्तावित करण्यात आला होता.
पण गेल्या वर्षी सादर केलेला हा प्रस्ताव प्रामुख्याने निवडणुकीमुळे लांबणीवर पडला होता. पण आता या प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळणार असे दिसते. सर्व भागधारकांच्या शिफारशी लागू केल्यामुळे, आम्हाला आशा आहे की कॅबिनेट लवकरच प्रकल्प मंजूर करेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
वाढत्या वाहतूक कोंडीला तोंड देण्यासाठी, MSRDC ने माडप, भाताण जवळ प्रत्येक बाजूला एक लेन आणि कामशेत जवळ दोन अतिरिक्त लेन जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. विस्तारीकरण दोन टप्प्यात केले जाणार असून मंजुरी मिळाल्यानंतर तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. बांधकाम आणि भूसंपादनासह प्रकल्पाची अंदाजे किंमत अंदाजे ₹5,000 कोटी एवढी आहे.
सध्या या महामार्गावर दैनंदिन वाहन संख्या 60 ते 70 हजार एवढी आहे मात्र सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये ही वाहन संख्या 90 हजार पर्यंत भिडते. यामुळे, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या देखील होते. यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महामार्ग आठ पदरी बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मुंबई ते पुणे अशी एक लेन आणि पुणे ते मुंबई अशी एक लेन वाढवण्याचा निर्णय राज्यस्तविकास महामंडळाने घेतला असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे प्रवास आणखी वेगवान होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या प्रस्तावित प्रकल्पाला लवकरच राज्य मंत्रिमंडळाचे मंजुरी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने याचे काम नवीन वर्षात सुरू होणार असे दिसत आहे.
एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने नमूद केले की, “हा एक्सप्रेसवे २००२ मध्ये सुरु झाला अन आता २१ वर्षांनी या महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. जेव्हापासून हा महामार्ग सुरू झाला आहे तेव्हापासून या महामार्गाची वाहन संख्या दरवर्षी ५% वाढली आहे.”
अव्यवस्थित वाहतूक आणि अपघातांमध्ये वाढ झाल्याबद्दल वारंवार प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. पुणे आणि मुंबई दरम्यान नियमितपणे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, “सतत ट्रॅफिक जॅममुळे सध्याचा प्रवासाचा अनुभव तणावपूर्ण आहे” असे सांगून प्रकल्पाला गती देण्याची विनंती केली आहे.