Mumbai-Pune Expressway : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे या दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी अधिक महत्त्वाची राहणार आहे.
कारण की, आता मुंबई ते पुणे हा प्रवास गतिमान होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एम एस आर डी सी ने या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
खरंतर दैनंदिन कामानिमित्त मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. या दोन्ही शहरादरम्यान ये-जा करण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा वापर केला जातो.
या महामार्गावर सध्या दिवसासाठी 70 ते 80 हजार वाहने धावत आहेत. परिणामी हा मार्ग देशातील सर्वाधिक वर्दळ असलेला महामार्ग म्हणून ओळखला जात आहे.
परंतु मार्गाच्या क्षमतेपेक्षा या मार्गावर अधिकची वाहने धावत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होऊ लागली आहे. वाहतूक कोंडीमुळे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास अधिक किचकट आणि क्लिष्ट बनला आहे.
अलीकडे वाहतूक कोंडीची तीव्रता अधिक भासू लागली आहे आणि याचा परिणाम म्हणून अपघातांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. हेच कारण आहे की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा एक्सप्रेस वे रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या हा एक्सप्रेस वे सहा पदरी आहे. पण आता हा महामार्ग आठ पदरी करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने हा मार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला असून याचे काम देखील आता सुरू झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस वे रुंदीकरणाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले आहे. खालापूर ते खोपोली आणि तळेगाव टोलनाक्यावरील एक्सप्रेस वे आठपदरी करण्याचे काम सुरू झाले आहे.
या प्रकल्पांतर्गत खालापूर येथील टोलनाक्यांवरील टोल बूथ संख्या 16 वरून 34 पर्यंत वाढवले जाणार आहे. तसेच तळेगाव येथील टोल बूथची संख्या 28 पर्यंत वाढवली जाणार आहे. हे अतिरिक्त टोल बूथ 2024 पासून कार्यान्वित केले जातील अशी माहिती एम एस आर डी सी कडून मिळत आहे.
पहिल्या टप्प्यात या एक्सप्रेस वे ला शक्य असेल तिथे आठ पदरी करण्याचे काम पूर्ण केले जाणार असून दुसऱ्या टप्प्यात बोगद्यांचे काम पूर्ण केले जाणार आहे. महामार्ग रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळू शकणार आहे.