Mumbai News : भारतात प्रवासासाठी रेल्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे. देशात रेल्वे प्रवाशांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. खिशाला परवडणारा, जलद आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेचा प्रवास ओळखला जातो. दरम्यान मुंबई येथील रेल्वे प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे मुंबईवरून दोन स्पेशल ट्रेन चालवणार आहे. खरंतर सध्या संपूर्ण देशात क्रिकेट वर्ल्ड कपसाठी मोठी धूम पाहायला मिळत आहे. भारताने लीग स्टेज मधील आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि नंतर अफगाणिस्तानला नमवत लीग स्टेजमध्ये भारताने दमदार कामगिरी केली आहे.
आता भारताचा तिसरा सामना पाकिस्तान सोबत रंगणार आहे. या सामन्याची संपूर्ण देशात मोठी चर्चा रंगली आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी संपूर्ण देशभरातील क्रिकेट प्रेमी अहमदाबाद मध्ये हजेरी लावणार आहेत. राजधानी मुंबईहून देखील मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी उद्या अर्थातच 14 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे हजर राहतील.
दरम्यान मुंबई मधील क्रिकेट प्रेमींसाठी पश्चिम रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला होता. यानुसार मुंबई ते अहमदाबाद दरम्यान एक वर्ल्ड कप स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय झाला होता. मात्र ही ट्रेन अवघ्या 17 मिनिटांच्या काळातच हाऊसफुल झाली आहे. अशा परिस्थितीत पश्चिम रेल्वेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक स्पेशल ट्रेन चालवणार आहे.
खरंतर सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेनची सर्व तिकीटे आरक्षित झाली आहेत. यामुळे आता मुंबईहून अहमदाबादसाठी आज अर्थातच 13 ऑक्टोबर रोजी आणखी एक स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये 299 आसन अतिरिक्त राहणार आहे.
कसं असेल वेळापत्रक ?
या दुसऱ्या स्पेशल ट्रेन चे वेळापत्रक देखील पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार आज 13 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी मुंबई सेंट्रल येथून ही स्पेशल ट्रेन अहमदाबाद कडे रवाना होणार आहे. ही ट्रेन उद्या अर्थातच 14 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी अहमदाबाद येथे पोहोचणार आहे.
या गाडीच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी अहमदाबाद येथून 15 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजता सुटेल आणि सकाळी साडेदहा वाजता मुंबई सेंट्रल ला पोहोचणार आहे.