Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई येथील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे कामाचे अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. सध्या राजधानीहून सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. यातील चार गाड्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धावत आहेत. तसेच उर्वरित दोन गाड्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून धावत आहेत.
मुंबई व्यतिरिक्त नागपूर येथूनही दोन वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत. मुंबई येथील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू आहे.
नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर देखील ही गाडी चालवली जात आहे. दरम्यान, राज्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असून ही गाडी राजधानी मुंबई ते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहरादरम्यान चालवली जाणार आहे.
श्रीक्षेत्र कोल्हापूर येथे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक गर्दी करत असतात. मुंबई मधून देखील दररोज करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापुरात हजेरी लावतात. याशिवाय कोल्हापुरातील नागरिक देखील दररोज शिक्षण, उद्योग, नोकरीं, अन पर्यटन इत्यादी कामानिमित्त मुंबईला जातात.
यामुळे या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवली गेली पाहिजे अशी मागणी आहे. यानुसार रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणार असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे याचे संभाव्य वेळापत्रक देखील समोर आले आहे. सदर संभाव्य वेळापत्रकानुसार, या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून पाच वाजून पन्नास मिनिटांनी रवाना होईल आणि मुंबई येथे बारा वाजून 56 मिनिटांनी पोहोचणार आहे.
अर्थातच मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास वंदे भारत ट्रेन मुळे सात तासांवर येणार आहे. सध्या अन्य वाहनांनी मुंबई ते कोल्हापूर दरम्यानचा प्रवास केला तर नऊ ते बारा तासांचा कालावधी लागतो. यामुळे वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर या मार्गावरील प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. परिणामी या गाडीला प्रवासी चांगली पसंती दाखवतील असे मत व्यक्त होत आहे.
तथापि, ही गाडी केव्हा सुरू होणार हा प्रश्न नागरिकांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित होऊ लागला आहे. या गाडीचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे, मात्र अजूनही ही गाडी सुरू होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था आहे. रेल्वे विभागाकडून देखील या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर येत नाहीये.
यामुळे मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरू होणार ही केवळ अफवा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तथापि रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील तीर्थक्षेत्रांना वंदे भारतची कनेक्टिव्हिटी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आत्तापर्यंत अनेक तीर्थक्षेत्रांसाठी ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली आहे. यामुळे कोल्हापूरला देखील लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळू शकते अशी आशा आहे.