Mumbai News : केंद्र शासनाच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक मजबूत बनवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. पायाभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाचा नेहमीच भर राहिला आहे. सरकारच्या प्रयत्नातून रस्ते आणि रेल्वे वाहतूक मजबूत केली जात आहे.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशात विविध महामार्गाची कामे केली जात आहेत. सोबतच नवनवीन लोहमार्ग, रेल्वेमार्ग देखील विकसित होत आहेत. मात्र देशात असेही अनेक प्रकल्प आहेत जी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. यामध्ये काही लोहमार्ग प्रकल्पांचा देखील समावेश होतो.
नवी मुंबईमधील नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग प्रकल्प देखील असाच एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प तब्बल 25 वर्षांपासून रखडलेला आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. ऐन दिवाळीच्या काळात या प्रकल्पाबाबत एक अतिशय गोड, आनंदाची बातमी समोर आली आहे.
यामुळे मुंबईकरांची दिवाळी आणखी गोड होईल असे मत व्यक्त होत आहे. खरंतर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांसाठी विविध कौतुकास्पद निर्णय घेतले जात आहेत. वेगवेगळ्या मार्गावर विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक गतिमान आणि सुरक्षित होत आहे.
अशातच आता नवी मुंबईकरांसाठी नेरूळ ते उरण हा रेल्वे मार्ग सुरू केला जाणार असे वृत्त समोर आले आहे. खरंतर नेरूळ ते उरण या रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नेरूळ ते खारकोपर हा पूर्ण झाला आहे. या पहिल्या टप्प्यावर प्रवासी वाहतूक देखील सुरू झाली आहे. हा पहिला टप्पा 2018 मध्ये सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला होता.
दरम्यान दुसऱ्या टप्प्याचे अर्थातच खारकोपर ते उरण पर्यंतच्या रेल्वे मार्गाचे काम देखील जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गावरून रेल्वे चालवण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र देखील रेल्वे आयुक्तांच्या माध्यमातून विभागाला देण्यात आले आहे. आठ महिन्यांपूर्वी सुरक्षा आयुक्तांनी हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.
मात्र तरीही या मार्गावर अजून लोकल धावलेली नाही. यामुळे उरणकरांच्या माध्यमातून सातत्याने या मार्गावर लोकल केव्हा सुरू होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशातच आता उरणकरांना एक मोठी भेट मिळाली आहे. रेल्वे बोर्डाने या मार्गावर लोकल सुरू करण्यास आता मंजुरी दिली आहे.
सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी ही परवानगी देण्यात आली आहे. Railway Board कडून मंजुरी मिळाली म्हणून आता लवकरच या मार्गावर लोकल सुरू होणार आहे. या मार्गावर लोकल सुरू झाल्यानंतर उरणकरांना लोकलने थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवास करता येणार आहे.
यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि उरण या दरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे. हा मार्ग या परिसरातील एकात्मिक विकास सुनिश्चित करेल तसेच नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल अस मत व्यक्त होत आहे. सध्या स्थितीला नेरूळ ते खारकोपर या रेल्वे मार्गावर लोकलच्या 20 फेऱ्या चालवल्या जात आहेत. परंतु खारकोपर ते उरण या मार्गावर लोकलच्या 40 फेऱ्या चालवल्या जातील असे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे नेरूळ ते खारकोपर दरम्यानच्या 20 फेऱ्यांपैकी काही फेऱ्या थेट उरण पर्यंत चालवल्या जाणार आहेत आणि काही फेऱ्या नव्याने सुरू होतील अशी माहिती समोर आली आहे. तथापि, खारकोपर ते उरण या मार्गावर लवकरात लवकर लोकल सुरू करा आणि उरणकरांना दिलासा द्या अशी मागणी प्रवाशांच्या माध्यमातून आजही उपस्थित करण्यात आली आहे.