Mumbai News : मुंबईकरांसाठी मेट्रोबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर मुंबई आणि उपनगरातील नागरिकांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी तसेच नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी करावा यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी शहरात विविध पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सोबतच शहरात मेट्रोमार्गांचे जाळे विकसित केले जात आहे.
2026 पर्यंत शहरात आणि उपनगरात मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. दरम्यान शहरातील एका महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कुलाबा – वांद्रे – सीप्झ या भुयारी मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून डिसेंबर 2023 मध्ये हा पहिला टप्पा मुंबईमधील नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. सीप्झ ते वांद्रे हा या मार्गाचा पहिला टप्पा आहे. जो की, वर्षाच्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे कॉर्पोरेशनचे लक्ष्य आहे.
येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मेट्रो ३ चा पहिला टप्पा म्हणजे आरे येथील स्थानक ते बीकेसी स्थानक पर्यंतचे काम पूर्ण केले जाणार आहे. यामुळे सीप्झ ते वांद्रे दरम्यानचा प्रवास गतिमान होणार आहे. विशेष म्हणजे वांद्रे ते कुलाबा हा दुसरा टप्पा जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
दरम्यान हा मार्ग संपूर्ण भुयारी राहणार आहे. या पूर्ण मेट्रोमार्गामध्ये एकूण 27 स्थानके असून यापैकी 26 स्थानके भुयारी आणि एक स्थानक जमिनीवर राहणार आहे. दरम्यान हा मार्ग तयार करताना दक्षिण मुंबईतल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंना हानी पोहोचणार नाही याची काळजी कॉर्पोरेशनकडून घेतली जात आहे.
सध्या आरे मधील कार शेडचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे इथे मेट्रोचे डबे दाखल होत आहेत. पहिल्या टप्प्यासाठी एकूण 9 मेट्रो लागणार आहेत. यापैकी आठ डबे आरे येथील कार शेडमध्ये दाखल झाले आहेत. आणखी एक डब्बा येत्या काही दिवसात येथे दाखल होणार आहे.
यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत या मार्गाचा पहिला टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो, असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे. यामुळे नियोजित वेळेत हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.