Mumbai News : मुंबई व मुंबई महानगर प्रदेशात अर्थातच एम एम आर क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाढत्या वाहतूककोंडीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागात देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत या भागातील शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या नवीन निर्णयानुसार आता एका नवीन उन्नत मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. या नवीन उन्नत मार्गामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएमआरडीए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर नवीन उन्नत मार्ग तयार होणार आहे.
खरे तर विठ्ठलवाडी येथून सध्या स्थितीला कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर जायचे असेल तर जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून जावे लागते. मात्र हा प्रवास करताना कल्याण आणि उल्हासनगर शहराला वळसा मारून जावे लागते. त्यामुळे हा प्रवास करण्यासाठी सध्या स्थितीला 40 मिनिटांचा वेळ लागत आहे.
विशेष म्हणजे यामुळे कल्याण आणि उल्हासनगर शहरात वाहतूक कोंडी होत आहे. पण आता जुन्या पुणे लिंक रोडवरून थेट कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी एक नवीन उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी सातशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच या प्रकल्पासाठी सर्वे पूर्ण झाला असून यासाठी आवश्यक असलेल्या जागेपैकी 70% जागा संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर या शहरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. श्रीकांत शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे, या प्रकल्पासाठीच्या कामाची लवकरच निविदा जाहीर केली जाणार आहे.
तसेच येत्या दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी हा प्रकल्प कल्याण आणि उल्हासनगर शहराला जोडणारा राहणार असे सांगितलं आहे.
या उन्नत रोड प्रकल्पांतर्गत कल्याण विठ्ठलवाडी डेपो ते शहाड पर्यंत रस्ता तयार केला जाणार आहे. हा उन्नत रोड वालधुनी मार्गे जाणार आहे. सध्या विठ्ठलवाडी ते शहाड या प्रवासासाठी 40 मिनिटांचा वेळ लागत आहे पण हा प्रकल्प पूर्ण झाला की हा प्रवास फक्त चार मिनिटात पूर्ण होणार आहे.