Mumbai News : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सध्याचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग. हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून आत्तापर्यंत या महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. सर्वप्रथम या महामार्गाचा पहिला भाग म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला यानंतर 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला आहे.
तसेच या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा या महामार्गाचा शेवटचा टप्पा असून याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल आणि यानंतर नव्या वर्षात हा संपूर्ण महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
याच शेवटच्या टप्प्यातील इगतपुरी-कसारा भागात 260 कोटी रुपये खर्चून राज्यातील सर्वात उंच पूल बांधण्यात आला आहे. हा पूल बांधण्यासाठी चार लाखांहून अधिक मजुरांनी तीन वर्षांहून अधिक काळ मेहनत घेतली आहे. हा या प्रकल्पाचा सर्वाधिक आव्हानात्मक टप्पा म्हणून ओळखला जातो.
मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावरील इतर 72 पूल अवघ्या दीड वर्षात पूर्ण झाले. मात्र इगतपुरी-कसारा विभागात बांधलेला हा पूल आव्हानात्मक राहिला. हा पूल, 95 मीटर उंच म्हणजे सुमारे 32 मजली इमारतीच्या समतुल्य, एका खोल दरीत बांधलेला आहे. हा पूल महाराष्ट्रातील सर्वात उंच पूल आहे.
जे 1.85 किलोमीटर लांब आहे. हा पूल या द्रुतगती मार्गावरील दुसरा सर्वात लांब पूल आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे बांधलेला अडीच किलोमीटर लांबीचा पूल सर्वात लांब आहे. हा पूल ज्या भागात बांधला होता त्या भागातील खडक कठीण होता.
अशा परिस्थितीत पुलासाठी 70 खांबांचा पाया बांधण्यासाठी कामगारांना मोठी कसरत करावी लागली. येथे बांधलेल्या काही खांबांचा पाया पाच मीटर खोलपर्यंत घातला गेला. हा पूल इगतपुरीतील सर्वात लांब ७.७ किलोमीटर लांबीच्या बोगद्यापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे.
या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इगतपुरी-कसारा परिसरातील धोकादायक घाटातून वाहनचालकांना जावे लागणार नाही. पुलाच्या मदतीने कसारा येथील इगतपुरी ते वाशाळा हे १७ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी १५ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणार आहे.
सध्या हा प्रवास पूर्ण करायचा असेल तर प्रवाशांना 45 मिनिटांचा वेळ लागतो. ट्रॅफिक जॅम असेल तर याच प्रवासासाठी दोन तास देखील खर्च करावे लागतात. हा पूल पूर्णपणे तयार झाला असून पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.