Mumbai News : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची प्रकल्प मार्गी लागली आहेत. राज्यात अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मुंबईमध्ये देखील गेल्या काही वर्षांमध्ये मोठमोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्णत्वास गेली आहेत तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरू आहेत. यातील कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबईमधील सर्वाधिक महत्त्वकांक्षी प्रकल्प समजला जातो.
दरम्यान महाराष्ट्राला आणखी एका नव्या कोस्टल रोडची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. यातील मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला देखील झाला आहे.
यामुळे मुंबईकरांचा प्रवास अगदीच सुपरफास्ट झाला असून प्रवाशांना या प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतोय. या मार्गावरून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असून राजधानी मुंबईच्या धर्तीवरच आता नवी मुंबईमध्ये देखील कोस्टल रोड तयार केला जाणार आहे.
नवी मुंबई येथील विमानतळ आणि अटल सेतूला हा प्रकल्प जोडणी देणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळ ते अटल सेतू दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. सध्या अटल सेतूहून नवी मुंबई विमानतळाकडे जायचे असल्यास प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसतोय. दरम्यान प्रवाशांची हीच अडचण लक्षात घेऊन नवी मुंबई कोस्टल रोड बांधला जाणार आहे.
नवी मुंबई कोस्टल रोड हा थेट नवी मुंबई विमानतळाला जोडला जाणार आहे. यासह हा कोस्टल रोड अटल सेतुला देखील कनेक्ट केला जाणार आहे. या कोस्टल रोडमुळे सायन पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण देखील कमी होणार आहे. सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
कसा असणार रूट?
नवी मुंबईमध्ये तयार होणाऱ्या या नव्या कोस्टल रोड चा नेमका रूट कसा राहणार हा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित होतोय. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा नवा कोस्टल रोड, सायन-पनवेल मार्गाला नेरुळ ते खारघरदरम्यान एक दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देणार आहे.
या कोस्टल रोडमुळे पामबीच मार्गाबरोबर सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कायमची फुटणार आहे. नवी मुंबई विमानतळाकडे तसेच अटल सेतूकडे जाण्यासाठी त्याचा फायदा होईल. सिडकोच्या माध्यनातून नेरुळ जेट्टी ते खारघर असा किनारी मार्ग अर्थात कोस्टल रोड उभारला जात आहे.
खारघर कोस्टल रोडला सीआरझेडची परवानगी सुद्धा मिळालेली आहे. अर्थातच याचे काम लवकरच पूर्ण होणार असे दिसते. नियोजित वेळेत या प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सिडको आग्रही आहे. या कोस्टल रोडची लांबी ही 9.6 किमी आहे. म्हणजेच मुंबई येथील कोस्टल रोड पेक्षा याची लांबी कमी राहणार आहे.
हा नवा कोस्टल रोड सायन-पनवेल महामार्गाला ओलांडून बेलापूर जेट्टीला जोडला जाईल, तिथून पुढे पाम बीच मार्ग पार करून, नेरुळ जेट्टीपर्यत जाणार आहे. खारघर-बेलापूर-नेरुळ असा हा कोस्टल रोड सायन-पनवेल रोडसाठी नवीन दुवा ठरणार आहे. नक्कीच या कोस्टल रोड प्रकल्पामुळे नवी मुंबईमधील वाहतूक क्षेत्रात एक मोठी क्रांती आपल्याला पाहायला मिळणार आहे.