Mumbai New Vande Bharat Express : महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून आता राज्याला आणखी एका ट्रेनची भेट दिली जाणार आहे.
सध्या नागपुर-बिलासपुर, मुंबई-गांधीनगर, मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर आणि मुंबई-गोवा या राज्यातून जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर ही गाडी सुरू आहे. अशातच आता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे.
मुंबई येथील सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. खरंतर सध्या मुंबई ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करण्यासाठी केवळ एकच ट्रेन उपलब्ध आहे.
यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मोठ्या मरणयातना सहन करून येथील प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याने या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी अशी प्रवाशांची मागणी होती.
दरम्यान प्रवाशांची ही मागणी पाहता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून यासाठी गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. आता हा पाठपुरावा यशस्वी झाला असून मुंबई ते कोल्हापूर दरम्यान आता येत्या काही महिन्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राची 6 वी वंदे भारत
आत्तापर्यंत महाराष्ट्राला पाच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली असून मुंबई ते कोल्हापूर दरम्यान सुरू होणारी ही सहावी गाडी राहणार आहे. सध्या मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास रेल्वे मार्गाने पूर्ण करण्यासाठी 11 ते 12 तासांचा कालावधी खर्च करावा लागतो. परंतु वंदे भारत एक्सप्रेस ने हा प्रवास मात्र सात तासात पूर्ण होणार असा दावा केला जात आहे.
याचाच अर्थ प्रवाशांचा चार ते पाच तासांचा बहुमूल्य वेळ यामुळे वाचणार आहे. साहजिकच या ट्रेनमुळे या मार्गावरील प्रवास गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी रोजाना मुंबईवरून हजारो प्रवासी कोल्हापूर येथे येतात.
या हजारो प्रवाशांना या गाडीमुळे निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कोल्हापूरहून देखील रोजाना मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. राजधानीत कामानिमित्त रोजाना हजारो प्रवासी जातात. यामुळे कोल्हापूर ते मुंबई प्रवासासाठी देखील ही ट्रेन फायदेशीर ठरणार आहे.
मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस ला कुठे थांबे राहणार?
एका मीडिया रिपोर्ट मधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन या अति महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप रेल्वेच्या माध्यमातून कोणतीच अधिकारीक माहिती हाती आलेले नाही. मात्र या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे.
केव्हा सुरू होणार मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस?
ही गाडी केव्हा सुरू होणार याबाबत रेल्वेच्या माध्यमातून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. पण या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, पुणे मिरज मार्ग दुहेरी करण्याची काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार आहेत. यामुळे मार्च 2024 नंतर या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन सुरू होणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे.