Mumbai New Vande Bharat Express : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला लवकरच आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. सध्या देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी मुंबई येथून चार वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहेत.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या चार महत्त्वाच्या मार्गावर ही देशातील पहिली हाई स्पीड ट्रेन चालवली जात आहे.
अशातच आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईहुन आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यास मंजुरी दिली असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते उत्तर प्रदेश राज्यातील जोनपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे.
महाराष्ट्राचे पूर्व गृहराज्यमंत्री आणि उत्तर प्रदेश राज्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या पुढाकाराने या मार्गावर लवकरच ही गाडी सुरू होणार आहे. खरंतर उत्तर प्रदेश मधून मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राजधानी मुंबईमध्ये कामानिमित्त येत असतो.
उत्तर प्रदेशवरून दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक मुंबईमध्ये दाखल होतात. मुंबई मधूनही हजारो नागरिक दररोज उत्तर प्रदेश मध्ये जातात. अशा स्थितीत हा एक व्यस्त मार्ग म्हणून ओळखला जातो.
यामुळे या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली हाई स्पीड ट्रेन सुरू करण्याची मागणी कृपा शँकर सिंग यांनी केली होती. त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे ही गाडी सुरू करण्याची मागणी केली होती.
दरम्यान त्यांच्या या मागणीला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई ते जौनपूर शहरापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यास तत्वतः मान्यता दिली असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे.
या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी सिंग यांनी वैष्णव यांना पत्र दिले होते. त्यांच्या याच पत्राची दखल घेत शनिवारी अर्थातच 18 नोव्हेंबर 2023 ला रेल्वेमंत्र्यांनी या नव्या ट्रेनचे मार्ग सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे आता लवकरच या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे. आता या रूटवर लवकरात लवकर वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यासाठी मार्गाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या रुट सर्व्हेनंतर मग या ट्रेनचे थांबे, मार्ग आणि वेळापत्रक ठरवले जाणार आहे.
निश्चितच ही बातमी मुंबईमध्ये स्थायिक असलेल्या उत्तर प्रदेशमधील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक राहणार आहे. या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर उत्तर प्रदेश मधील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे मुंबई ते उत्तर प्रदेश हा प्रवास अधिक जलद आणि गतिमान होणार आहे.