Mumbai Mhada Lottery : महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अर्थातच म्हाडा सर्वसामान्य नागरिकांसाठी दरवर्षी हजारो घरांसाठी लॉटरी काढत असते. खरंतर अलीकडे मुंबई, पुणे सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे या महानगरांमध्ये घर घेणे म्हणजे स्वप्नापल्याड गोष्ट बनली आहे.
अशा परिस्थितीत हजारो लोक म्हाडा कडून उपलब्ध करून देणाऱ्या घरांसाठी अर्ज करत असतात. त्यामुळे म्हाडाची लॉटरी कधी जाहीर होणार याकडे अनेकांच्या नजरा असतात. महत्वाचे म्हणजे म्हाडाच्या विविध विभागीय मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी हजारो घरांसाठी लॉटरी काढली जात असते.
यंदाही म्हाडा मुंबई मंडळाकडून मुंबईतल्या विविध भागातील 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी सध्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे. खरे तर, ही प्रक्रिया कधीच संपली असती मात्र म्हाडाने या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे.
दरम्यान, मुंबई मंडळाच्या याच घराच्या लॉटरी संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. खरे तर, म्हाडाच्या या घरांसाठीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिल्यानंतर याची प्रत्यक्षात संगणकीय सोडत कधी निघणार? याबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित केला जात होता.
पण आता याचं लॉटरीच्या संगणकीय सोडतीची तारीख समोर येत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाचे लॉटरी विजेते यंदा त्यांच्या नवीन घरात दिवाळी साजरी करू शकणार आहेत. म्हाडा मुंबई मंडळ 2030 च्या घराच्या लॉटरीचा निकाल ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निघणार असे बोलले जात आहे.
लॉटरी निघाल्यानंतर विजेत्यांना पैसे भरून घरांचा ताबा दिला जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून 2030 घरांसाठी लॉटरीची प्रक्रिया सुरू आहे. याआधी लॉटरीचा निकाल 13 सप्टेंबरला लागणार होता, मात्र लॉटरीला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर म्हाडाने घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी केल्या.
घरांच्या किमती कमी केल्यानंतर म्हाडाने ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया बंद झाल्यानंतर अर्जदारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम सुमारे आठ ते दहा दिवसांत पूर्ण होईल.
मग पात्र अर्जदारांची यादी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल. ही यादी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच लॉटरी निघणार असल्याचे खात्रीलायक वृत्त नुकतेच समोर आले आहे.
म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लॉटरीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असल्याने कागदपत्र पडताळणीला जास्त वेळ लागणार नाही. लॉटरी निघाल्यापासून काही दिवसांत विजेते पैसे जमा करून त्यांच्या घराच्या चाव्या मिळवू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, राज्यात वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात ऑक्टोबरच्या मध्यापासून आचारसंहिता लागू होऊ शकते. पण, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे.