Mumbai Mhada Lottery News : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा दरवर्षी विविध विभागीय मंडळाच्या माध्यमातून हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर करत असते. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध महानगरांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या असल्याने सर्वसामान्यांच्या नजरा माडाच्या लॉटरीकडे लागलेले असतात. म्हाडा दरवर्षी सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून देत असते.
म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांमुळे लाखो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या चालू वर्षात मुंबई मंडळाने देखील 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीमध्ये मुंबई कार्यक्षेत्रातील विविध भागातील घरांचा समावेश करण्यात आला आहे.
या लॉटरीसाठी 9 ऑगस्ट पासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे. म्हाडाच्या या घरांसाठी 4 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र या मुदतीत या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे मंडळांने 19 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्यास मुदत दिलेली आहे.
एवढेच नाही तर मंडळांने या लॉटरीमध्ये समाविष्ट असणाऱ्या जवळपास 370 घरांच्या किमतीत मोठी कपातही केली आहे. या घरांच्या किमती जवळपास 12 लाख रुपयांपासून ते 75 लाख रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र अशातच म्हाडा मुंबई मंडळांने या लॉटरीमध्ये समाविष्ट असणाऱ्या 14 घरांच्या किमती वाढवण्याचा एक नवीन निर्णय आता घेतलेला आहे. या निर्णयाचा सर्वसामान्यांना नक्कीच मोठा फटका बसणार आहे.
स्वानंद सहकारी गृहनिर्माण सोसायटी इमारत क्रमांक 33 नेहरुनगर, कुर्ला येथील 14 घरांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. येथील घरांच्या किमती साधारणता 13 लाख रुपयांनी वाढवल्या गेल्या आहेत.
आधी या घरांच्या किमती 43.97 लाखांपासून ते 45.40 लाख रुपये एवढ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र आता या घरांच्या किमती 56.79 लाखांपासून ते 58.63 लाख रुपयांपर्यंत वाढवल्या गेल्या आहेत.
दरम्यान म्हाडाच्या या 2030 घरांसाठी 8 ऑक्टोबरला प्रत्यक्षात संगणकीय सोडत काढली जाणार असून यानंतर विजेत्या अर्जदारांना घरांचा ताबा दिला जाणार आहे. तसेच ज्यांना या लॉटरीमध्ये घर लागणार नाहीत त्यांना या घरांसाठी सादर केलेली अनामत रक्कम 9 ऑक्टोबर पासून दिली जाणार आहे.